बरोबर ११ वर्षांपूर्वी म्हणजे ९ जुल २००५ च्या मध्यरात्री दिग्रसजवळील नांदगव्हाण धरण फुटून शहराजवळच्या धावंडा नदीला आलेल्या महाप्रलयाने नदीकाठची अनेक घरे क्षणार्धात उद्ध्वस्त होऊन १६ जणांचे बळी गेले होते. आज त्या घटनेने धावंडाच्या आक्रदनांची आठवण होऊन अनेकांची ह्रदये चर्र होत आहेत. दुर्देव असे की, एक दशकाचा कालावधी लोटूनही ९५७ कुटुंबे आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत दिवस काढत आहेत.
रात्री झोपेतच असलेले लोक पुराच्या पाण्यात वाहू लागले. तब्बल १६ जणांचे या प्रलयात बळी गेले. यापकी १३ जणांचे मृतदेह आढळले आणि एकाच कुटुंबातील तिघांच्याही मृतदेहांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. धावंडाच्या या प्रलयात २० हजार नागरिकांना पुराचा तडाका बसला होता. ५ हजार हेक्टरात पिकहानी झाले. धावंडाग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी दरवर्षी मोच्रे, आंदोलने, उपोषण, घेराव, असे प्रकार सुरू आहेत. पुनर्वसनासाठी २० कोटी रुपये मिळाले. एका घराच्या बांधकामासाठी दीड लाख रुपये मंजूर झाले आहे. दिग्रसजवळ भवानी टेकडी परिसरात पुनर्वसनासाठी ९५७ घरांचे बांधकाम मंजूर असून ४०० घरांचे ज्योत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सर्व घरांचे बांधकाम डिसेंबर २०१४ पर्यंत करण्याचे शासनाचे आदेश दिले होते. दुर्देवाने अजूनही हजारावर कुटुंबे नदीकाठी वस्ती करून राहत आहेत. नांदगाव धरण फुटल्याने धावंडाच्या प्रलयात अनेक पाळीव जनावरे वाहून गेल्या होत्या. पुरात अडकलेल्या लोकांना, लहान मुले व महिलांना वाचवण्यासाठी मध्यरात्री अनेक नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून केलेल्या कार्याच्या आठवणीबरोबरच आपल्या डोळ्यादेखत बायकापोरे वाहून गेल्याचे दुख आजही ताजी आहेत.
शहराजवळील भवानी माता टेकडीजवळ दहा हेक्टर जमिनीवर ९५० घरकुलांची निर्मिती करून तेथे पुनर्वसन कार्य करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ऑक्टोबरच्या २०१२ ला तत्कालीन राज्यमंत्री संजय देशमुख यांनी भूमिपूजनही केले होते. मात्र, कासवगतीने सुरू असलेल्या पुनर्वसन कार्याला वेग कधी मिळणार, हे सांगायला कुणी तयार नाही. आता राज्यात भाजप-सेनेचे सरकार झाले, पण धावंडा आक्रंदनाची स्थिती जैसे थे अशीच आहे.

पुनवर्सन आणि मदन येरावार
दिग्रसला ज्या नांदगव्हाण या मातीच्या धरणातून १० वर्षांंपूर्वी पाणीपुरवठा होत असे ते धरण ९ जुल २००५ ला फुटले. मात्र, त्यांनतर हे धरण बांधण्याचे कष्ट सरकारने घेतले नाही. त्याऐवजी अरुणावती धरणावरून पाणीपुरवठा करण्याची योजना अंमलात आणल्यामुळे आता धरण फुटण्याचा धोकाच नाहीसा झाला आहे. पावसाळ्यात या धरणातून सारे पाणी वाहून जाते. आता धावंडाचे आक्रंदन पुन्हा होणे नाही, हे खरे असले तरी ‘त्या’ आक्रंदनाने उद्ध्वस्त झालेल्या संसारांचे पुनर्वसन कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरित राहणार नाही, याची जबाबदारी नवे राज्यमंत्री मदन येरावार घेतील, अशी धावंडाग्रस्तांना आशा आहे.