‘पोलीस व सशस्त्र सेना बल विभागातील कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना प्रसंगी रजा मिळत नाही. कारण कधी काय अडथळे उद्भवतात, त्याचे अलीकडचे ताजे उदाहरण म्हणजे ‘तो वेडा मुख्यमंत्री’! दिल्लीच्या रस्त्यावर उपोषण करून त्यांनी वेडेपणाच दाखवून दिला,’ अशी खरमरीत टीका केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांचे नाव न घेता केली.
कळमनुरी तालुक्यातील येलकी शिवारात ७७ एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या सशस्त्र सीमा बल प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री वर्षां गायकवाड, आमदार राजीव सातव आदींची या वेळी उपस्थिती होती.
शिंदे यांनी सांगितले की, ‘एस. एस. डी.’ च्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यात सोलापूर व हिंगोली जिल्ह्य़ांत ही वाहिनी सुरू झाली. गृह विभागामार्फत असलेल्या एस. एस. डी., आय. टी. बी. पी., सी. आय. एस. एफ., सी. आर. पी. एफ. यांसारखे सात केंद्रीय अर्धसनिक पोलीस दल कार्यरत असून, त्यांची प्रशिक्षण केंद्रे देशभरात स्थापन करण्यात येणार आहेत. पोलीस व सशस्त्र सेना बल यासारख्या विभागात नोकरी करणे किती कठीण आहे, या बाबत शिंदे यांनी स्वत: उमेदीच्या काळात घेतलेले अनुभव या वेळी कथन केले.
स्वतच्या विवाहानंतर मधुचंद्रासाठीची सुटी रद्द झाल्याचा अनुभव सांगताना या विभागात येणाऱ्या अडथळ्यांचे ताजे उदाहारण म्हणून त्यांनी केजरीवाल यांचे नाव न घेता टीका केली.
दिल्लीत रस्त्यावर आंदोलन करणारा वेडा मुख्यमंत्री, अशी संभावना करून या आंदोलनाच्या बंदोबस्तामुळे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या सुटय़ा रद्द झाल्या व मलाही या कार्यक्रमाला येता येईल की नाही? अशी शंका निर्माण झाली होती.