मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खळबजनक आरोपानंतर, आता राज्यातील राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. शिवाय महाविकासआघाडी सरकारला देखील घेरलं जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी दरेकर म्हणाले, “जर पोलीस खात्यात आजही एक याचिका दाखल केली गेली, ज्या याचिकेत रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या बदल्यांचा उल्लेख केलेला आहे. तर, आता मला वाटतं या सर्व गोष्टी बाहेर येत आहेत, हे तर केवळ एका विभागाचं झालं. आता इतर विभागातील काही अधिकारी व अन्य सर्व बाबी बाहेर येत आहेत. मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक सरकारं झाली, पण इतका बेधुंद कारभार आणि अशाप्रकारची चर्चा व गोष्टी या अगोदर कधीच झाल्या नाहीत.”

कितीही झाकलं तरी सत्य लपणार नाही! “ये पब्लिक है, ये सब जानती है!” – दरेकर

तसेच, राज्यपालांनी अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊन, राष्ट्रपतींपर्यंत त्याचा रिपोर्ट पोहचवावा अशी देखील मागणी भाजपा करत आहे, यावर बोलताना दरेकर म्हणाले, “केवळ भाजपाचीच मागणी आहे म्हणून तो रिपोर्ट राष्ट्रपतींकडे पोहचवतील असं नाही. तर, राज्यात आज सर्वस्तरावर अराजकता पसरलेली आहे. आज कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवार उडालेला आहे. कुणीही सुरक्षित नाही, भ्रष्टाचार मोठ्याप्रमाणावर सुरू आहे. गृहमंत्रीच १०० कोटींच्या खंडणीचं टार्गेट देत असतील, तर सरकारलाच नैतिकता नाही की सरकारने सत्तेवर राहावं. राष्ट्रपती या सर्व गोष्टींचा आढावा घेत असतात व घटनेने दिलेल्या सर्व गोष्टी ते करत असतात.” असंही यावेळी दरेकर म्हणाले
याचबरोबर “आता बऱ्याच गोष्टी समोर येतील, मागील काळात परमबीर सिंग आयुक्त असतानाच या गोष्टी झाल्या आणि आता त्यांच्यावर आल्याने ज्या गोष्टी या सरकारने त्यांच्या माध्यमातून केल्या, त्या ते पुढे आणतील असं मला वाटतं आहे.” असा इशारा यावेळी दरेकर यांनी दिला.

“हे भांबावलेलं सरकार आहे, कुठल्याही प्रकारचा निर्णय ते घेत नाहीत, केवळ तीन पक्षाचं सरकार कसं टिकवायचं हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे. राज्यात शेतकऱ्याचं काय सुरू आहे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे, पोलीस विभागात काय सुरू आहे. करोना रूग्ण आजही वाढत आहेत. केवळ आमच्या तीन पक्षांचा समन्वय राहिला पाहिजे, सत्ता टिकली पाहिजे, त्यासाठी वाटेल ते करा. या भोवतीच हे सरकार फिरताना दिसतं आहे.” असा आरोपही यावेळी दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर केला.