पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकावरून भाजपाला मोठ्याप्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागत आहे. विरोधीपक्षांच्या नेते मंडळींसह सोशल मीडियाद्वारे देखील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी देखील याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालण्यास देखील सांगितले आहे. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नसल्याचा इशारा देखील खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विटद्वारे दिला आहे. त्यांच्या ट्विटवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत, मी असं कोणतं विधान केलं? ज्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला, असा सवाल केला आहे.

मा.छत्रपती संभाजी राजे आम्ही आपला नेहमीच आदर करतो. संजय राऊत यांनी असं कोणतं विधान केलं, ज्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच चालत आहे. सदैव चालत राहील. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी छत्रपती संभाजी राजेंच्या ट्विटवर दिली आहे.

या अगोदर छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विट करून, प्रत्येकवेळी छत्रपतींच्या घराण्यावर गरळ ओकून ते राजकारण राजकारण करत असल्याचा संजय राऊत यांच्यावर आरोप केला होता. तसेच, त्यांनी अगोदर माहिती घ्यायला पाहिजे होती की, मॉ जिजाऊ जयंती, सिंदखेडराजा येथे मी काय बोललो आहे, असेही म्हटले होते.

तर, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा छत्रपती संभाजी राजेंनी दिलेला आहे. तसेच, ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील, असा देखील इशारा त्यांनी दिलेला आहे.

जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन करण्यात आले. दिल्ली भाजपाच्या कार्यालयात पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या पुस्तकाचे वृत्त सोशल माध्यमातून पसरल्यानंतर भाजपावर सगळीकडून टीका केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.