सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात ठेऊन आषाढीवारीसाठी पंढरपुरात दाखल झालेल्या एका वारक -याचा एसटी बसने ठोकरल्याने जागीच मृत्यू झाला. तसेच पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर वेळापूरजवळ वारकरी असलेल्या टेम्पोची मोटारसायकलला धडक बसल्याने मोटारसायकलस्वाराचा अंत झाला.
पंढरपुरात एसटी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारक -याचे नाव सीताराम तुकाराम भोसले (७४, रा.अंकोली, ता. मोहोळ) असे आहे. मृत भोसले हे गेल्या पन्नास वर्षांपासून पंढरपूर आषाढी यात्रेत वारी करीत होते. यंदाच्या वारीतही विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते एसटी बसने पंढरपूरला गेले आणि तेथील नवीन एसटी बसस्थानकावर उतरल्यानंतर लघुशंकेसाठी पाठीमागील बाजूला गेले असताना यवतमाळ आगाराच्या एसटी बसची त्यांना धडक बसली. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर वेळापूरजवळ वारकरी असलेल्या टेम्पोची एका मोटारसायकलला धडक बसून घडलेल्या अपघातात मोटारसायकलस्वार समीर प्रभाकर निंबाळकर (२७, रा. चौंडेश्वरवाडी, ता. माळशिरस) याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वारकरी प्रवास करीत असलेल्या टेम्पोचालकाविरुद्ध वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धनराज सुदान पाटील (रा. कुसीम, ता. अंमळनेर, जि. जळगाव) असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.