तालुक्यातील दारणा धरणातील पाणी मराठवाडय़ासाठी सोडल्यानंतर आता मुकणे धरणातील पाणीही छुप्या पद्धतीने गेल्या १५ दिवसांपासून सोडण्यात येत असल्याची तक्रार करीत शेकडो शेतकऱ्यांनी धरणावर धडक देऊन हे पाणी बंद केले. स्थानिकांचा विरोध डावलून पुन्हा पाणी सोडण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार शिवराम झोले यांनी दिला आहे.
तालुक्यात चालू वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील धरणेही पूर्णपणे भरली नाहीत. असे असताना शासन तालुक्यातील धरणातील पाण्याचा मोठय़ा प्रमाणात विसर्ग करीत असल्याने पुढील काळात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची स्थानिकांची भावना आहे. यापूर्वी औरंगाबादसाठी दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पंधरा दिवसांपासून मुकणे धरणातून अविरतपणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके व माजी आमदार शिवराम झोले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी अचानक थेट धरणावर धडक मारली. या धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करावा, या मागणीचे निवेदन दहा दिवसांपूर्वी देण्यात आले होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत पाटबंधारे विभागाने पाणी सोडणे सुरू ठेवले, असा आरोप आंदोलकांनी केला. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी धरणाच्या दरवाजांचे संचलन होणाऱ्या कक्षात जाऊन पाण्याचा विसर्ग बंद केला. पाण्याअभावी सांजेगाव, मोडाळे, कावनई, रायांबे, आवळी, आहुर्ली आदी गावांतील शेती व्यवसाय धोक्यात आला असून बंद केलेले पाणी पुन्हा सोडण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला.