रायगड जिल्ह्यत जलयुक्त शिवार योजनेमुळे शेती उत्पादकतेत वाढ झाली आहे. दुबार पेरणीखालील क्षेत्रातही वाढ झाली असून पिक कापणी प्रयोगातून हे निष्कर्ष समोर आले आहेत.

या संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त माहितीनुसार,  जिल्ह्यत सन २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान  अंतर्गत ४५ गावांमध्ये ९७० जलसंधारण उपचाराची कामे हाती घेण्यात आली होती. त्यावर्षी या कामांवर ३० कोटी ९० लक्ष ६८ हजार रुपये निधी खर्च झाला होता. तर सन २०१६-१७ मध्ये ३८ गावांमध्ये १ हजार १४६ कामे हाती घेण्यात आली होती.

शेती आणि पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावे, आणि राज्य पाणी टंचाईमुक्त व्हावे. यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरु करण्यात आली आहे. जलसंधारण उपचारांमुळे भुगर्भातील जलपातळी वाढतानाच जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो. त्यामुळे साहजिक पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन उत्पादकता वाढते. सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांंतील कामांचा एकत्रित परिणाम पाहण्यासाठी जिल्ह्यत पिक कापणी प्रयोग राबविण्यात आले. मुरुड, महाड, पोलादपूर आणि म्हसळा तालुक्यात भात पिकासाठी राबविण्यात आले. या चारही तालुक्यात एकूण १८ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण उपचाराची कामे राबविण्यात आली होती.  या चारही तालुक्यांची सरासरी भात पिकाची उत्पादकता ही २४.९३ क्विंटल प्रति हेक्टर इतकी होती. जलयुक्त शिवार अभियानाच्या जलसंधारण उपचारानंतर भात पिकासाठी ३३.१४ क्विंटल प्रति हेक्टर इतकी झाली. म्हणजेच भात पिकाच्या उत्पादकतेत ८.२१ क्विंटल प्रति हेक्टर प्रमाणे वाढ झाली.

त्याचप्रमाणे पेण , खालापुर, सुधागड, महाद आणि श्रीवर्धन या तालुक्यांमधील गावांमध्ये  नाचणी पिकासाठी पिक कापणी प्रयोग राबविण्यात आले. या पाच तालुक्यातील २० गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश होता.  या पाचही तालुक्यांत मिळून सरासरी नाचणी उत्पादन हे ६.९५ क्विंटल प्रति हेक्टर होते ते जलयुक्त शिवार अभियानानंतर ८.७६ क्विंटल प्रति हेक्टर इतके झाल्याचे दिसून आले. म्हणजेच नाचणी पिकाच्या उत्पादकतेत १.८१ क्विंटल प्रति हेक्टर इतकी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यत दुबार पेरणी क्षेत्रात म्हणजेच रब्बीच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सन २०१४-१५ मध्ये रब्बीचे क्षेत्र जिल्ह्यत १८.५४ हेक्टर इतके होते. ते सन २०१६-१७ मध्ये २८.४४ इतके झाले आहे. म्हणजेच रब्बी क्षेत्रात ९.९० हेक्टर इतक्या क्षेत्राने वाढ  झाली आहे. सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यत जलयुक्त शिवार अभियानामुळे २५१.६७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

एकूणच जिल्ह्यतील शेतकरी आता दुबार पिक पद्धतीकडे वळत आहेत. दुबार पिक पद्धतीत भाजीपाला लागवडीकडेही शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येत आहे. भाजीपाला हे पिक नगदी असल्याने शेतकरी भाजीपाल्याची लागवड अधिक करताना दिसत आहेत. शिवाय भाजीपाल्याला स्थानिक बाजारपेठही उपलब्ध असते. याशिवाय किलगडही काही शेतकऱ्यांनी लावले असून त्यांनी चांगले उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. जलयुक्त शिवारमुळे भूजल पातळी वाढल्याने अनेक भाजीपाला उत्पादक शेतकरी हे विहिरीच्या पाण्यावर भाजीपाला उत्पादन घेताना दिसत आहेत. कांदा, तोंडली, वांगी, शिराळी, काकडी, किलगड, मिरची यांची लागवड मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.