सूत्रधार गुजरातमधील, विधानसभा निवडणूकही लढवली

नगर : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून व्यापारी व व्यावसायिकांची लूट (ड्रॉप) करणाऱ्या ‘हायप्रोफाईल’ टोळीतील चौघांना नगरच्या स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे-मुंबई या जुन्या महामार्गावर कार्ला फाटा येथे अटक केली. टोळीतील दोघे मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या टोळीचा सूत्रधार राजस्थानमधील असून तो आता गुजरातमधील बडोदा येथे स्थायिक झाला आहे. मात्र त्याने लुटीच्या पैशातून पुणे व परिसरात प्रचंड मालमत्ता खरेदी केली आहे. याशिवाय त्याच्याकडे ऑडी, फॉच्र्युनर, डस्टर अशा महागडय़ा गाडय़ा आहेत. त्या जप्त करण्यात आल्या आहेत. या सूत्रधारानेच पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याने गुजरात राज्यात काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली आहे.

भीमाभाई गुलशनभाई सोलंकी (४१, मूळ रा. बडोदा, गुजरात, सध्या रा. देवगाव, तळवडे, पुणे) असे या सूत्रधाराचे नाव आहे. हारुण सय्यद अहमद शेख (४३, देवगाव, तळवडे), गणेश हिरा काशिद (नागपूर, सध्या पुणे), संतोष शिवराम गोपाळे (४२, आकुर्डी, पुणे) या चौघांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने नगरसह मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सातारा तसेच कर्नाटकमध्येही स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत मोठमोठय़ा रकमांना व्यापाऱ्यांना लुटले आहे.

जुन्या घरांचे खोदकाम करताना ‘घबाड’ सापडले, अशी बतावणी करत हे सोने अत्यंत स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना रक्कम घेऊन निर्जन भागात बोलवायचे व खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांना दबा धरून बसलेल्या टोळीने मारहाण करत त्यांच्याकडील रक्कम लुटण्याच्या पद्धतीला गुन्हेगारी वर्तुळात ड्रॉप असे संबोधतात. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला नमुना म्हणून खरे सोने दाखवले जाते. पारंपरिक गुन्हेगारी टोळय़ांची ही लुटमारीची पद्धत आता हायप्रोफाईल टोळय़ांनी स्वीकारल्याचे पोलीस सांगतात.

जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून  बनावट ग्राहक पाठवले. परंतु टोळी सराईत असल्याने बनावट सोने दाखवण्यासाठी वारंवार जागा बदलत होते. परंतु त्यांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पाठलाग करत पकडले व शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले.

पुण्यात प्रचंड मालमत्ता खरेदी

टोळीचा सूत्रधार मूळचा राजस्थानमधील व सध्या गुजरातमध्ये स्थायिक झालेला असला तरी त्याने लूटमार करत मिळवलेल्या संपत्तीतून पुणे परिसरात मोठी मालमत्ता खरेदी केली आहे. त्याचा एक आलिशान फ्लॅट, फार्म हाऊसही आहे. राहते घर स्वतंत्र आहे. शिवाय आलिशान गाडय़ांचा त्याला शौक आहे. सूत्रधार भीमाभाई त्याच्या साथीदारांना मजूर असल्याचे भासवतो. हे साथीदार मजुराचा वेश करून राज्यभर फिरतात. भीमाभाईने चांदी व सोन्याची नाणी तयार करून ठेवली आहेत. त्याची धाटणी जुन्या बनावटीची आहे. ही नाणी खोदकाम करताना सापडली असे भासवले जाते. हे सर्व सोने स्वस्तात विक्रीचे आमिष दाखवले जाते. काही वेळेला तर त्याने बनावट हिरे दाखवूनही फसवणूक केली आहे.