राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व विखे कुटुंबीय यांच्यात छत्तीसचा आकडा आहे ही चर्चा चुकीची आहे. राजकारणात कोणीही कोणाशी कायमस्वरूपी शत्रुत्व किंवा मैत्री ठेवत नाही. शरद पवार आणि मी देखील याचेच अनुकरण करतो, असे सूचक वक्तव्य अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे.  मी राष्ट्रवादी किंवा भाजपाच्या संपर्कात नाही, मात्र दोन दिवस थांबा चित्र स्पष्ट होईल. जनतेच्या मनात काय आहे, त्यानुसार निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील जनावरांच्या छावण्यांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी डॉ. सुजय विखे नगरमध्ये आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. इतर पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तुम्ही त्रासदायक वाटता, त्यामुळे तुम्हाला विरोध होतो आहे, या प्रश्नावर बोलताना विखे म्हणाले, की मला घाबरण्याचे कारण नाही, कोणी नेता छोटा किंवा मोठा नसतो, पद महत्त्वाचे नाही तर प्रत्येकाची कामातून ओळख निर्माण होत असते. ज्यांचे काम चांगले त्याला जनतेचे समर्थन मिळते. मी गेल्या तीन वर्षांपासून रात्रंदिवस लोकांत आहे, कामाची ओळख हाच निवडणुकीचा निकष असायला हवा, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभेवर सात वेळा निवडून गेलेले माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे यांचा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी नेहमीच राजकीय संघर्ष राहिला. विखे हे राज्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात. पवारांची भूमिका ही नेहमीच विखे कु टुंबीयांच्या विरोधी राहिली. अहमदनगरची जागा काँग्रेसने प्रतिष्ठेची केली असली तरी ही जागा सोडण्यास राष्ट्रवादीने ठाम नकार दिला आहे. सुजय विखे पाटील याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.