छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला जामीन मिळाल्यामुळे त्याची नाशिक कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहा बाहेर येताच छिंदम अज्ञातस्थळी रवाना झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे आणि सरकारी कामात अडथळा आणला असे दोन गुन्हे छिंदमवर दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यात नगर सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि.९) १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आज दुपारी त्याला नाशिक कारागृहातून सोडण्यात आले.

छिंदम याने १६ फेब्रुवारीला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्याची क्लिप व्हायरल होताच नगर शहरात व राज्यात खळबळ उडाली होती. त्याचे पडसाद नगरसह संपूर्ण राज्यात उमटले होते. छिंदम याचे कार्यालय तरुणांनी फोडले होते. त्याच दिवशी छिंदमविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखाविल्याचा गुन्हा नोंदविला होता. शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांसह विविध संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या.