अहमदनगरमधील नेवासे तालुक्यात आंतरजातीय विवाह केला म्हणून स्वत:च्या मुलीची हत्या करुन फरार झालेल्या वडिलांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. मुलीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा बचाव वडिलांनी केला असला तरी पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. तरुणीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिची हत्याच करण्यात आली, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

संगमनेरमधील देवेंद्र कोठावळे हे एका औषध कंपनीत नोकरी करतात. त्यांचे श्रीरामपूर शहरातील एका औषध विक्रीच्या दुकानात काम करणाऱ्या प्रतिभा ब्रह्मदेव मरकड हिच्यावर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्याला प्रतिभाच्या आई-वडिलांनी विरोध केला होता. १ एप्रिल रोजी देवेंद्र व प्रतिभा यांनी विवाह केला. प्रतिभा ही संगमनेर येथे देवेंद्र यांच्या घरी राहू लागली. प्रतिभाने लग्न केल्याची माहिती घरी दिली. पण आई-वडिलांनी या प्रकारावर राग व्यक्त केला.

काही दिवसांनी माहेरी आलेल्या प्रतिभाशी संपर्क होत नसल्याने तिच्या पतीने कौठा येथे येऊन प्रतिभाच्या घरी चौकशी केली. तेव्हा त्याला प्रतिभा हिचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले. हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने देवेंद्र कोठावळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिभाचे आई-वडील फरार झाले.

प्रतिभाच्या आई-वडिलांनी गोड बोलून तिला नवऱ्याच्या घरुन गावी आणले आणि तिची हत्या केली. प्रतिभाच्या मृतदेहाचे अवशेष पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तसेच काही प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले. आणखी काही महत्त्वपूर्ण गोष्टी तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसरीकडे प्रतिभाचे आई वडील फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत असून वडील ब्रह्मदेव मरकड याने नेवासे येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. प्रतिभा हिचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला आहे. पोलिसांनी न्यायालयात बाजू मांडताना प्रतिभा हिचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तिचा खूनच करण्यात आल्याचे सांगत अर्जाला विरोध केला आहे.