पालघर जिल्ह्यात बारा हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

पालघर: पालघर जिल्ह्यतील आरोग्य विभाग व एकात्मिक महिला बाल विकास विभाग तसेच महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत प्रमाणित केलेले खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या करोना लसीकरणासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत लसीकरणासाठीची पूर्वतयारी सुरू असून यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध अधिकारी वर्गाचा समावेश असलेल्या जिल्हा कृती दलाची (टास्क फोर्स) बैठक घेण्यात आली.

पालघर जिल्ह्यतील बारा हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना करोना लस देण्यात येणार असून प्राधान्यक्रमाने पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग व महिला बाल विकास विभाग कर्मचाऱ्यांना ही लस टोचली जाणार आहे. लस उपलब्धतेबाबत अजूनही निश्चितता नसली तरी लसीकरणाबाबतची पूर्वतयारी वेगाने सुरू झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावरून लसीकरणाची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. लसीकरणासाठीचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण पुढील आठवडय़ाच्या सोमवार, मंगळवारी घेण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यतील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाडी कर्मचारी, आशासेविका, जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य पथके, नगर परिषद, महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी अशा ९९ संस्थांचे एकत्रीकरण करून प्राधान्यक्रमाने पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. करोना काळात प्रत्यक्षात काम केलेल्या कर्मचारी वर्गाला प्रथमत: ही लस टोचली जाणार आहे. जिल्ह्यत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, महिला बालविकास विभाग, नगर परिषदेचे ९८२८ कर्मचारी, महापालिकेचे १५०० कर्मचारी तर नोंदणीकृत खाजगी आरोग्य सेवा देणारे दोन हजारहून अधिक कर्मचारी यांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे.

लसीकरणासाठी आरोग्य विभागामार्फत संकेतस्थळावर (पोर्टल डाटा अपलोड) नोंद केलेले अधिकारी-कर्मचारीच या लसीकरणासाठी पात्र ठरतील. जिल्ह्यत कोणत्या कंपनीची लस येणार हे अजूनही अनिश्चित असले तरी लसीकरणाच्या पूर्वतयारीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. हे लसीकरण कर्मचाऱ्यांना काही दिवसांच्या अंतराने दोनदा केले जाणार आहे. ज्या कंपनीची लस सुरुवातीला दिली गेली आहे, तीच लस दुसऱ्यांदा दिली जाणार आहे. इतर कंपनीची लस त्यांना दिली जाणार नाही. भारत बायोटेक, कॅडिला, सिरम या तीन कंपनीच्या लशींपैकी कोणतीही लस जिल्ह्यला उपलब्ध होऊ शकते. या तिन्ही कंपनीची लस पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहे. पहिली लस दिल्यानंतर भारत बायोटेकची दुसरी लस १४ दिवसानंतर दिली जाईल. कॅडिला कंपनीची लस २८  व  ५६ दिवस अशी तीनदा द्यावयाची आहे. तर सिरमची लस २८ दिवसाच्या अंतराने द्यायची आहे.

जिल्ह्यतील माता बालसंगोपन अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदींचे राज्यस्तरीय प्रशिक्षण होणार असून हे अधिकारी लसीकरणाची अंमलबाजवणी व नियोजन करणाऱ्या यंत्रणांना प्रशिक्षण देतील. लसीकरणासाठीची साहित्य-सामग्री राज्यस्तरावरून प्राप्त होणार आहे.

शाळा, सभागृहे शोधण्याचे काम युद्धपातळीवर

आरोग्य विभागामार्फत लसीकरणासाठीचे नियोजन सुरू आहे. लसीकरणासाठी किमान १०० जण सुटसुटीत राहू शकतील अशा शाळा, सभागृहे शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी पथके तैनात करून नोंदणी, लसीकरण, लसीकरणानंतर काही वेळ कर्मचाऱ्यावर देखरेख अशा सोयीसुविधा उभारल्या जाणार आहेत. जिल्हा स्तरावर यासाठी असलेल्या टास्क फोर्सप्रमाणे तालुक्यातही अशी समिती गठित केली जाणार आहे, जी लसीकरणाची अंमलबाजवणी करेल, अशी माहिती जिल्हा बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांनी दिली.