नगर : करोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात उपाययोजना केल्या जात आहेत. तज्ज्ञांनी लहान मुलांवर या लाटेचा अधिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. बालरोगतज्ञ्जां समवेत चर्चा करून उपाययोजना सुरू केल्या जात असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.

आयुर्वेद शास्त्र मंडळाच्या आवारात जय आनंद फाऊंडेशन व सन फार्मा कंपनीच्या सहकार्यातून हवेतून प्राणवायू निर्मिती प्रकल्पाची सुरुवात आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. नगरसेवक विपुल शेठीया, र्मचट बँकचे संचालक कमलेश भंडारी, सनफार्मा कंपनीचे प्रकल्पप्रमुख आर. व्ही. कुळकर्णी, कंपनीप्रमुख गिरीश भुजे, मुख्य अभियंता अविनाश पापडे, व्यवस्थापक दादासाहेब पाटील, श्रीनिवास न्यालपेल्ली, पर्यावरणप्रमुख महेश पाठक आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना सन फार्माचे प्रकल्पप्रमुख आर. व्ही. कुळकर्णी म्हणाले,की सन फार्मा कंपनीने करोना संकटकाळात देशात पाच ठिकाणी हवेतून प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारले. यापैकी एक नगर येथील आहे. प्रकल्प जर्मनीचा आहे. हवेतील जे घटक जे रुग्णांना नको असतात त्याचे विलगीकरण केले जाते, त्यामुळे शुद्ध प्राणवायू निर्मिती होईल.