जर्मनीतील माक्स प्लांक संस्थेच्या अभ्यासातील निष्कर्ष

नागपूर : प्रदूषणाच्या अनेक स्रोतांपैकी वायुप्रदूषण मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. दरवर्षी सुमारे ३० लाखाहून अधिक मृत्यू त्यामुळे होत असून आशियात हे प्रमाण अधिक आहे. जर्मनीतील माक्स प्लांक संस्थेत यावर सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.

आशियात वायुप्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू होण्याचे कारण म्हणजे हवेच्या प्रदूषणासोबतच लोकसंख्येची घनताही अधिक आहे. त्यामुळे अतिसूक्ष्म धूलिकण फुफ्फुसात जातात. अनेक लोक या अतिसूक्ष्म धूलिकणांसोबतच ओझोन आणि सल्फर डायऑक्साईडमुळे देखील आजारी होऊन मृत्युमुखी पडतात, असेही जर्मन संस्थेच्या अभ्यासात म्हटले आहे.

उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीचा आधार घेत या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एक यंत्रणा विकसित केली. शहरातील हवेला प्रदूषित करण्यासाठी केवळ वाहतूक आणि औद्योगिक कारखान्याच्या चिमण्याच जबाबदार नाहीत. तर डिझेलवर आधारित जनित्र, कोळशाच्या चुली आणि जळणारे लाकूड देखील धूर निर्माण करतात. भारतासह बांगलादेश आणि दक्षिण आशियात वायुप्रदूषणासाठी हे मुख्य कारण असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. वायुप्रदुषणामुळे वेळेच्या आधी मृत्यू होतात. चीनमध्ये दरवर्षी ही संख्या १४ लाख तर भारतात सात लाख आहे.

भारतात वायुप्रदूषण सर्वाधिक आहे हे मान्य, पण त्यासाठी ऑटोमोबाईल, कोळशाच्या चुली आणि जळाऊ लाकूड याला  जबाबदार धरणे चुकीचे आहे. कारण हजारो वर्षांपासून चुलीवरच स्वयंपाक केला जातो. मग त्यावेळी लोक प्रदूषणाने मृत्यू पावले का? मूळात प्रदूषणाच्या संदर्भात जे अहवाल येतात ते सॅम्पलिंग करून लगेच अहवाल तयार करतात. मात्र, अहवाल तयार करण्यापूर्वी त्याच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे.

– सुधीर पालीवाल, पर्यावरणतज्ज्ञ