देशावर कोणी वाईट नजर टाकत असेल तर त्यांना असेच चोख उत्तर मिळाले पाहिजे. भारतीय सेनेने केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पाकव्याप्त भागात भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे कौतुक करत अभिनंदन केले. भारतीय सेनेने पुलवामा घटनेचे उत्तर चोखरीत्या दिले आहे. यात आम्ही एक भारतीय नागरिक म्हणून सहभागी आहोत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारतीय सेनेने दिल्यानंतर त्याचे पडसाद अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये उमटले. विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात भारतीय सेनेचे अभिनंदन केले. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडला होता.

‘भारत हा कमजोर देश नाही. भारतीय वायुसेनेचा आम्हाला अभिमान वाटतो. मोदी यांनी भारतीय सैन्याला पुर्णपणे अधिकार दिले होते. जगातील शक्तीशाली देशापैकी भारत एक असल्याचे सैन्यांनी दाखवून दिले. महाराष्ट्राच्या वतीने वायुसेनेचे मनपूर्वक अभिनंदन करतो’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘मुंबईत नेहमी हाय अलर्ट असतो. जी काळजी घ्यायची ती घेत आहोत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. सर्व यंत्रणांचे लक्ष आहे’, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.