“भाजपाने कितीही ताणले तरी शिवसेना आणि भाजपा पक्षाची शंभर टक्के युती होणारच. शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. शिवसेनेला भाजपाशिवाय गत्यंतर नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना आता राहिली नाही. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे कमळाबाईला वाकवायचे, सरळ करायचे. परंतु आता उलट चाललंय “, असे म्हणत अजित पवार यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे.

रविवारी(दि.22) पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांवरही निशाणा साधला. “राजे, सरसेनापती आणि काही नेते भाजपात गेलेले आहेत. परंतु, मी डगमगलो नाही, आमच्या बरोबर आमचा कार्यकर्ता आहे. आम्ही कोणाच्या बापालाही घाबरत नाही”, असे म्हणत पक्षांतर केलेल्या नेत्यांवर माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला.

अजित पावर पुढे म्हणाले की, “वेगवेगळ्या कारणांमुळे पक्षांतर होत आहे. तिसऱ्या टप्प्यात अजून काही पक्षांतर करतील. ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊद्या. पण, पुन्हा आपलं सरकार आलं तर, दादा जाऊद्या पक्षात परत घ्या असं सांगायला येऊ नका. मी तर घेणार नाहीच पण, तुम्हीही आग्रह करू नका. नाहीतर जाऊ द्या हो दादा घ्या पदरात पण, पदर पार फाटला” असं म्हणत पक्षांतर करणाऱ्यांना अजित पवार यांनी चिमटा घेतला. तसेच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, “कोणी रुसायचं नाही किंवा फुगायचं नाही. नाराज होऊ नका, ज्यांना तिकीट दिलं जाणार नाही त्यांना दुसरीकडे संधी दिली जाईल”, असे अजित पवार म्हणाले.