अजित पवार यांची टीका

पक्ष कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी सर्वेक्षण करून इतर पक्षातील निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप गळ टाकून बसलेला आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज येथे केली.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जाण्यासाठी पवार आज नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. भाजप सत्ताधरी पक्ष म्हणून कायम इतर पक्षातील नेत्यांवर डोळा ठेवून असतो. त्यासाठी सर्वेक्षण केले जाते. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांचा शोध घेतला जातो. इतर पक्षातील नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी भाजप गळ टाकून बसलेला आहे. पालघर  लोकसभा  पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन लगेच उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या निरंजन डावखरे यांनाही पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले. भाजपाच्या १२२ आमदारांमध्ये ३० ते ३५ सदस्य काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री असलेले किंवा त्या क्षमतेचे आहेत. भाजपला अशाप्रकारे इतर पक्षातील लोकांना फोडण्याचे राजकारण योग्य वाटत असेल, पण त्यांनी कार्यकर्ते तयार करावे आणि त्यांना संधी द्यायला हवी. मात्र भाजप आणि त्यांचे राज्य स्तरावरील नेतृत्व तसा विचार करताना दिसत नाही, असे पवार म्हणाले.

पाकिस्तानचा शेतकरी जगवायचा की भारताचा?

पाकिस्तान रोज जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात हल्ले करीत असताना आणि या हल्ल्यात नुकतेच महाराष्ट्राचे आमदार बचावले असताना केंद्र सरकार पाकिस्तानातून साखर आयात करीत आहे. दुसरीकडे राज्यातील ऊस उत्पादक हवालदिल झाला आहे. सरकारला पाकिस्तानचा शेतकरी जगवायचा आहे की भारतातला, असा सवाल पवार यांनी केला.

डावखरेंचा पक्षत्याग स्वार्थासाठी

आमदार निरंजन डावखरे यांनी पक्ष सोडताना दिलेले कारण अतिशय तकलादू आहेत. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश केला, पक्षाने त्यांना विधान परिषदेत पाठवले. त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात येणार होती. त्यांनी भाजपमध्ये जाण्याची तयार केली होती, केवळ योग्य वेळेची वाट पाहत होते, असे पवार म्हणाले. आमदार नरेंद्र पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची बातमी वाचली, परंतु ते  माथाडी कामगार नेते आहेत. त्यांना कामगारांच्या प्रश्नासाठी सरकार दरबारी जावे लागते. असे नरेंद्र पाटील यांनी आपल्याला सांगितल्याचे पवार म्हणाले.

सरकारला कुणी अडवले?

जीएसटीबाबत निर्णय घेतला तर इंधन दरवाढीला आळा बसेल, असे मुख्यमंत्री सांगतात. केंद्रात आणि राज्यात यांचेच सरकार आहे. मग त्यांना अडवले कोणी, असा सवाल अजित पवार यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यास विकासावर परिणाम होईल, असे गडकरी म्हणतात. यापूर्वी विकास झाला नाही काय, दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले अपयश झाकण्याचा हा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.