|| शफी पठाण

‘‘करोनामुळे लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला असून अशा स्थितीत साहित्य संमेलनाची चर्चा हा क्रूरपणा ठरेल’’, अशा शब्दांत यंदा संमेलन घेण्याची शक्यता फेटाळणाऱ्या साहित्य महामंडळाचे ‘हृदय परिवर्तन’ झाले आहे. त्यामुळे यंदाही पारंपरिक पद्धतीनेच संमेलन भरवण्याच्या निर्णयापर्यंत महामंडळ आले आहे.
संमेलन आयोजित करण्याच्या नाशिकच्या प्रस्तावावर आज, रविवारी औरंगाबादमध्ये होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या सहस्रचंद्रदर्शनाची ‘विशेष भेट’ या संमेलनाच्या रूपात दिली जाणार असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे.

महाविकास आघाडीतील आपल्या सहकारी पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार-प्रसाराच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल, अशी प्रत्येक संधी साधण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.
शरद पवारांचा ८० वा वाढदिवस नुकताच झाला. त्यालाही अतिशय नियोजनपूर्वक ‘इव्हेंट’चे स्वरूप देण्यात आले होते. आता साहित्य संमेलनाकडेही तशाच संधीच्या रूपात पाहिले जात आहे. त्यामुळेच संमेलनासाठी गेल्यावर्षी प्रस्ताव पाठवणारे नाशकातील सार्वजनिक वाचनालय यंदा इच्छुक नसल्याचे कळताच नाशकातीलच लोकहितवादी मंडळाने क्षणाचाही विलंब न लावता प्रत्यक्ष औरंगाबादला जाऊन आपला प्रस्ताव सादर केला.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे माजी आमदार हेमंत टकले हे लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आहेत. ते शरद पवारांचे ‘निकटवर्तीय’ मानले जातात. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री आहेत. लगोलग त्यांनाही यजमानपदाची माहिती पोहोचविण्यात आली. त्यामुळे नाशिकच्या प्रस्तावाला आपोआपच ‘वजन’ प्राप्त झाले असून उद्या औरंगाबादेत होणाऱ्या बैठकीत नाशिकच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे सांगितले जाते.

दिल्लीतील मराठीजन संतप्त?

मराठीच्या अभिजात दर्जाविषयीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. तो पूर्ण ताकदीने केंद्र सरकारपुढे मांडता यावा आणि दिल्लीतील मराठी जनांनाही आपल्या मायबोलीचा उत्सव साजरा करता यावा, यासाठी ‘सरहद’ या संस्थेने मागच्याच वर्षी संमेलनाच्या आयोजनाचा प्रस्ताव दिला होता. परंतु तेव्हा उस्मानाबादची वर्णी लागली. किमान यंदातरी आपला विचार होईल, असे दिल्लीकरांना वाटत होते. परंतु संमेलन नाशिकला मिळतेय, असे कळल्यावर ‘सरहद’ संस्थेने महामंडळाला आपल्या प्रस्तावाबाबतचे स्मरणपत्र पाठवले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून महामंडळाने नाशिकचेच घोडे पुढे दामटवल्याने आणि इच्छुक दिल्लीकरांबाबत महामंडळाच्या अध्यक्षांनी काही चुकीची विधाने केल्याने दिल्लीतील मराठीजन संतापल्याची माहिती आहे.

महाराष्ट्राच्या निर्मितीला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मायमराठीचा गजर सांस्कृतिक नगरी असलेल्या नाशिकमध्ये निनादावा, या उद्देशाने साहित्य महामंडळाला प्रस्ताव पाठवला आहे. औरंगाबादच्या बैठकीत काय निर्णय होतो, त्याकडे लक्ष आहे. संमेलन आम्हाला मिळाले तर ते यशस्वी करून दाखवू. – हेमंत टकले, विश्वस्त, लोकहितवादी मंडळ, नाशिक