गेल्या चोवीस तासात दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व धरणाच्या खालील परिसरातही पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने धरण परिसरात प्रशासनाने शुक्रवारी सावधानतेचा इशारा दिला आहे.
महिन्याभरात जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात मुसळधार पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे दूधगंगेच्या पात्रातील पाण्याची पातळी सतत वाढत आहे. या पाणलोट क्षेत्रात सातत्याने वाढणाऱ्या पाण्यामुळे दूधगंगा धरणातून प्रति सेकंद चार हजार घनफूट विसर्ग सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असून धरणाच्या परिसरातील लोकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता वि. पां. पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, आजवर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कडवी, जंगमहट्टी, घटप्रभा, चित्री आणि कोदे ही पाच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी धरण ९९ टक्के भरले असून धरणातून दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्याशिवाय कासारी धरण ९५ टक्के, कुंभी धरण ९३ टक्के तर वारणा धरण ९१ टक्के भरले आहे. इतर धरणांमध्ये तुळशी ८९, दूधगंगा ८५, पाटगाव ८५, चिकोत्रा ५०, तर जांबरे ३७ टक्के भरले आहे.