कोणत्याही अटींशिवाय कर्जमाफी, शेतमालासाठी योग्य भाव या आणि अशा अनेक मागण्या घेऊन नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर म्हणजेच भिवंडीत येऊन धडकला आहे. या मोर्चात हजारो शेतकऱ्यांचा समावेश आहे. १२ तारखेला हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. आज या मोर्चातील शेतकऱ्यांचा मुक्काम भिवंडीत असणार आहे. त्यानंतर सोमवारी हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे.

राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे असा आरोप किसान सभेने केला आहे. नाशिकपासून लाँगमार्च काढत सुरु झालेला हा मोर्चा १२ तारखेला म्हणजेच सोमवारी विधान भवनावर धडकणार आहे. ३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. आस्मानी संकट आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आयुष्य संपवण्याचीही वेळ येते आहे. अशात जाहीर करण्यात आलेली कर्जमाफीही फसवी आहे. त्यामुळेच सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

 

काय आहेत मागण्या?

शेतकरी कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्याच्या नावावर कराव्यात

कोणत्याही अटी आणि शर्थी यांच्याशिवाय कर्जमाफी

शेती मालाला दीडपट हमीभाव

स्वामिनाथन आयोगातील रास्त शिफारसींची अंमलबजावणी

वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी

या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी १२ मार्चला किसान सभेचा हा भव्य मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. या मोर्चानंतर सराकर शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.