नवी मुंबईतील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्त नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. याच मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या आंदोलनामुळे सिडको मुख्यालयाकडे येणाऱ्या चारही मार्गांची बुधवारपासून नाकाबंदी करण्यात आली होती. वाहतुकीचे मार्गही बदलले होते. मात्र आता हे मार्ग पूर्ववत झाले आहेत.

नवी मुंबई पोलिसांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे.
पोलिसांनी बेलापूरच्या सिडको मुख्यालयाकडे येणारे सीबीडी महालक्ष्मी चौक, बेलापूर किल्ला, पार्क हॉटेल, पालिकेचे जुने मुख्यालय या चार मार्गांनी येणारे सर्व रस्ते अत्यावश्यक वाहनांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी काही काळ बंद केले होते.


मुंबईहून पुणे-गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला ऐरोली, शिळफाटा मार्गे कळंबोलीला लागत होते त्यानंतर ही वाहने पुणे- गोव्याकडे जाऊ शकत होती. मात्र आता हे निर्बंध उठवण्यात आले आहेत. तर पुण्याहून येणाऱ्या वाहनांना तळोजा येथील पुरुषार्थ पेट्रोलपंपापासून वळण घेऊन शिळफाटा मार्गे मुंबईत जावे लागणार होतं. पण थेट रस्ता आता सुरु झालेला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : पोलीस जिथे अडवतील, तिथंच ठिय्या आंदोलन; कृती समिती ठाम

वाशी टोलनाक्यावरून येणारी सर्व वाहने ही शिळफाटा मार्गानेच ये-जा करू होती. पोलिसांनी शीव-पनवेल मार्गावरील वाहतूक उरण फाटा ते खारघरपर्यंत बंद केली होती. मात्र आता सर्व मार्गांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.