होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी औषधे वापरण्यास राज्य सरकारने मान्यता दिल्याने राज्य होमिओपॅथी डॉक्टर्स कृती समितीने शनिवारी नगर शहरात आनंदोत्सव साजरा केला.
या निर्णयाबद्दल फटाके वाजवण्यात आले, ढोल ताशे वाजवत गुलाल उधळण्यात आला. डॉक्टरांनी ऐकमेकांना पेढेही भरवले. वाडिया पार्कमधील म. गांधी पुतळा, बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज व बाजार समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. समितीचे अध्यक्ष डॉ. विजय पवार, पदाधिकारी डॉ. अशोक भोजणे, डॉ. विनय गरुड, डॉ. अनिल कराडे, डॉ. प्रमोद लंके, डॉ. रणजित सत्रे आदी सहभागी झाले होते.
यासंदर्भात माहिती देताना डॉ. पवार यांनी सांगितले की, होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची औषधे वापरण्यास परवानगी द्यावी ही मागणी गेल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित होती. त्यासाठी कृती समितीने वेळोवेळी आंदोलने केली. राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या उपस्थितीत राज्य मेळावा घेऊन पुन्हा आंदोलन सुरु करण्याचा इशारा दिला होता. अखेर हे विधेयक राज्य सरकारने मंजूर केले. बॉम्बे होमिओपॅथी प्रॅक्टिशनर अॅक्ट १९५९ मधून ‘ओन्ली’ शब्द वगळण्यात आला आहे तसेच एमएमसी अॅक्ट १९६५ मध्येही दुरुस्ती करण्यात आली आहे. समितीच्या संघटीत संघर्षांचे हे फलित आहे.