कोल्हापूर बाजार समितीच्या बाजारपेठेत शनिवारी हापूस आंब्याच्या चार डझनच्या पेटीला ११,५०० रूपयांचा विक्रमी भाव मिळाला. त्यामुळे यंदाचा हंगाम आंबा उत्पादकांसाठी चांगला ठरणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महत्त्वपूर्ण बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याची आवक मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. नवी मुंबईतीला बाजारपेठेतही सध्याच्या घडीला दिवसाला साडेचारशे हापूस आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत.
हापूस आंब्याच्या इतिहासात ही सर्वाधिक आवक अशी नोंद झाली आहे. सर्वसाधारणपणे एप्रिलच्या अखेर हापूस आंब्याची घाऊक बाजारात आवक वाढत असल्याचे दिसून येते, मात्र यंदा जानेवारी महिन्यातील या सर्वाधिक आवकमुळे व्यापारी आश्चर्यचकित झाले आहेत. कोकणातील आंबा बागायतदार आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करून हे उत्पादन वाढवत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यंदाची थंडी आंब्याच्या उत्पादनासाठी पोषक ठरल्याचेही आंबा उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे.
कोकणातील रत्नागिरी, देवगड, वेंगुर्ला, मालवण, अलिबाग येथील हापूस आंब्याची तुर्भे येथील घाऊक बाजारात आवक टप्प्याटप्प्याने वाढू लागली आहे. डिसेंबर महिन्यात मुंबई-पुण्यातील काही किरकोळ हापूस आंब्याच्या पेटय़ा वगळता जानेवारीपासून घाऊक बाजारात हापूस आंब्याची नियमित आवक सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी सरासरी वीस ते पंचवीस पेटय़ा हापूस आंबा बाजारात येत असताना सोमवारी अचानक साडेचारशे हापूस आंब्याच्या पेटय़ा बाजारात आल्या होत्या.