कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरूणाला पोलीसांनी मंगळवारी रात्री अटक केली. अमोल पाटील नावाच्या या तरूणाने काही दिवसांपूर्वी ‘खूब जमेगा रंग जब मिलेंगे तीन यार, दाभोलकर, पानसरे, खेडेकर’ आणि “पानसरेची पण विकेट गेली ८१ वर आऊट. नरेंद्र दाभोलकरांचा विक्रम मोडून पानसरे सर्वात पुढे” अशाप्रकारचे लिखाण असलेल्या पोस्ट फेसबुकवर टाकल्या होत्या. या पोस्ट फेसबुक आणि व्हॉटसअपवर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाल्या होत्या. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात औरंगाबाद पोलीसांच्या सायबर सेलने अमोल पाटीलला शोधून काढले. काल रात्री औरंगाबाद पोलीसांनी त्याला अटक करून कोल्हापूर पोलीसांच्या हवाली केले. अमोल पाटीलने यापूर्वीही फेसबुकवर धार्मिक संघटना आणि अन्य विषयांच्याबाबतीत आक्षेपार्ह विधाने केल्याचे समोर आले आहे. याशिवाय, कोल्हापूर पोलीसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर अमोल पाटीलने आपणच ती पोस्ट टाकली असल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, अमोल पाटील हा कोणत्या धार्मिक संघटनेशी किंवा त्याचा पानसरे यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, याबद्दल पोलीसांकडून तपास सुरू आहे.