अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; काँग्रेसकडून सक्षम उमेदवाराचा शोध

उमेदवाराची खर्च करण्याची ऐपत आणि राजकीय सोय हे प्रमुख निकष लावून उमेदवारी देण्याचे राजकीय पक्षांचे धोरण जगजाहीर असताना पुढल्या वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राजकारणातील ‘अर्थकारण’ आणि ‘घोडेबाजार’ याची चर्चाही उघडपणे सुरू झाली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची त्यांनी तयारी केली आहे. मे २०१८ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. काँग्रेसची सदस्यसंख्या आता १४१ वरून  ११२ वर आली आहे. भाजपने  ४६ वरून १६५ अशी सदस्यसंख्या गाठली आहे. येत्या डिसेंबरमध्ये चिखलदरा नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतून सदस्यसंख्या वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. अशा स्थितीत  राज्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे कोणता उमेदवार दिला जातो, याचे औत्सुक्य आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी रिंगणातून बाहेर पडून काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या चंद्रकुमार जाजोदिया यांचे नाव सध्या उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख हे पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवीण पोटे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा वेग वाढवला आहे. महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपला चांगली कामगिरी करता आली, याचे समाधान त्यांना असले, तरी जिल्हा परिषदेत सत्ता नाही, याची खंत त्यांच्या समर्थकांना आहे.

प्रवीण पोटे यांनी गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा ३८ मतांनी पराभव केला होता. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अजय नावंदर यांच्यामुळे येथे तिरंगी लढत झाली होती. भाजपसाठी ही जागा जिंकणे अवघड होते, मात्र काँग्रेस आघाडीतील असंतुष्टांमुळे भाजपचे कमळ फुलले होते. या पराभवानंतर काँग्रेसला सावरता आले नाही. संख्याबळात सरस असूनही काँग्रेसला हादरा बसला होता. काँग्रेसच्या पराभवाची ती ‘हॅटट्रिक’ होती.  गेल्या निवडणुकीत नाटय़मय घडामोडीत माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी आपली तलवार म्यान केली होती. भूविकासक असलेले चंद्रकुमार जाजोदीया यांनी काँग्रेसचे उमेदवार बबलू देशमुख यांना समर्थन जाहीर करीत माघार घेतली होती.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रवीण पोटे त्यावेळी इच्छुक होते, पण शेवटच्या क्षणी त्यांनी भाजपची उमेदवारी मिळवली आणि त्यांचे भाग्य फळफळले. त्याआधी झालेल्या दोन निवडणुकांमध्ये थेट लढतीत जगदीश गुप्ता यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला होता. २००० मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अन्वर खान यांचा तर २००६ मध्ये मिलिंद चिमोटे यांचा त्यांनी पराभव केला होता. पक्षाचे संख्याबळ मोठे असूनही निवडणुकीत विजयासाठी ते कामी येत नाही, असा इतिहास असताना येत्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होईल का, हा प्रश्नही चर्चेत आला आहे.

गेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडीचे संख्याशास्त्र ‘राजकीय जाणकार’ मतदारांना पसंत पडले नाही.  गेल्या निवडणुकीच्या वेळी प्रवीण पोटे हे यांच्यासाठी राजकीय क्षेत्र नवखे होते.काँग्रेसला प्रवीण पोटे यांचा सामना करण्यास ‘सर्वार्था’ने सक्षम असलेल्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागत आहे.

  • सध्या मतदारांपैकी भाजपकडे सर्वाधिक १६५ सदस्य आहेत. काँग्रेसचे ११२,राष्ट्रवादी काँग्रेसचे २९ तर शिवसेनेचे २८ सदस्य आहेत. इतर सदस्यांमध्ये प्रहार, युवा स्वाभिमान, एमआयएम, इतर राजकीय पक्ष आणि अपक्ष सदस्यांचा समावेश आहे. यावेळी चार नगरपंचायतींच्या ६८ सदस्यांसह मतदारांची संख्या ३९७ वरून ४६५ वर पोहचली आहे.
  • गेल्या निवडणुकीत मतदारांची संख्या ३९७ होती. काँग्रेसकडे सर्वाधिक ११२ सदस्य होते. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीकडे ५४, भाजप ४६, शिवसेना ४३, प्रहार २५, अपक्ष ४८, विदर्भ जनसंग्राम १८, इतर पक्ष किंवा आघाडी ५१ अशी विभागणी होती. कागदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या भक्कम दिसत होती.
  • या मतदार संघात २००६ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी मतदारांची संख्या ४०२ इतकी होती. काँग्रेसकडे सर्वाधिक ११६ मतदार होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून ही संख्या १५९ एवढी होती. भाजप-शिवसेना युतीच्या सदस्यांचे संख्याबळ १२०, तर इतर पक्षाचे २८ आणि अपक्ष ९५ अशी विभागणी होती. तरीही काँग्रेसला हादरा बसला.
  • यापुर्वी अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून काँग्रेसचे ए.के. देशमुख, काँग्रेसच्या माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख, भाजपचे माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी प्रतिनिधित्व केले आहे. जगदीश गुप्ता हे २००० ते २०१२ पर्यंत एक तप आमदार होते.