मलठण रेल्वे स्थानकावरील सिग्नल यंत्रणा बंद पाडून चोरट‌्यांनी पुण्याहून सोलापूरला येणारी हुतात्मा एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी रात्री घडला. चोरट‌्यांनी डी १ व डी ४ डब्यात खिडकीजवळ बसलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत सुमारे एक लाख रूपयांचे सोने चोरीला गेले असण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत लोहमार्ग पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. मलठण रेल्वे स्थानकापासून दीड किमी अंतरावर अंधारात हा प्रकार घडला.

दौंड-कुर्डुवाडी दरम्यान असलेल्या मलठण रेल्वे स्थानकाच्या होम सिग्नलवर शनिवारी सांयकाळी ७ वाजून २० मिनिटांनी हुतात्मा एक्स्प्रेस आली. सिग्नल यंत्रणा बंद केल्याने हुतात्मा एक्स्प्रेसला लाल सिग्नल मिळाला. त्यामुळे गाडी थांबली. त्याचवेळी चोरट्यांनी डी १ व डी ४ डब्यातील खिडकीजवळ बसलेल्या दोन महिलांचे मंगळसूत्र, गंठण हिसकावले. सुमारे एक लाख रूपयांचे सोने चोरीला गेले.

दरम्यान, या गाडीला रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा पुरवण्यात येत नाही. त्यामुळे चोरट्यांनी हुतात्मा एक्स्प्रेसला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येते. पूर्वी या गाडीबरोबर लोहमार्ग पोलिसांचा बंदोबस्त असायचा. पण गेल्या काही वर्षांपासून या गाडीला सुरक्षा पुरवण्यात येत नाही.