गेल्या काही वर्षात इंजिनिअर झालेल्या अनेक तरुणांनी सर्वाधिक मागणी असलेल्या चहा विकण्याच्या व्यवसायात उडी घेतल्याचे दिसते. विविध प्रकारे शक्कल लढवून नाविन्यपूर्ण पद्धतीने चहा विक्रीमुळे या तरुणांच्या चहाला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. याच कंपूत आता नाशिकच्या सायखेडा येथील एक तरुणीचाही समावेश झाला आहे. रुपाली शिंदे असं या तरुणीचं नाव असून ती केमिकल इंजिनिअर आहे. सध्या ती तंदूर आणि बासुंदी चहाच्या विक्रीमुळे चर्चेत आली आहे. तिच्या या उद्योजकदृष्टीचे कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील केले आहे.

निफाड तालुक्यातील सायखेडा येथील रहिवासी असलेल्या रुपाली बाळासाहेब शिंदे या तरुणीने कठोर मेहनतीच्या जोरावर सिन्नर तालुक्यातल्या चिंचोली येथील सर विश्वेश्वरय्य इन्स्टिट्यूटमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. डिस्टींक्शनमध्ये ही पदवी पास झाल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याने ती चिंतेत होती. मात्र, निराश न होता तिने सुरुवातीला ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु केला. मात्र, त्यात काही विशेष मिळकत होत नसल्याने तिने नव्या प्रयोगासह चहाचे दुकान चालवण्याचं ठरवलं. सुरुवातीला तिच्या या निर्णयाला घरातून आणि नातेवाईकांकडून विरोध झाला. मात्र, त्यानंतरही मागे न हटता रुपालीने आपला चहा विक्रीचा निग्रह कायम ठेवला. त्यात नाविन्यपूर्ण बदल केले. आज तिच्या तंदूर आणि बासुंदी चहाला नवी ओळख मिळाली आहे. वैशिष्ट्यपूर्ण चहा असल्याने अनेक मान्यवर आणि राजकीय व्यक्ती देखील हा चहा पिण्यासाठी इथं थांबतात.

दरम्यान, नाशिकच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या चहाची माहिती मिळाली आणि त्यांनी या चहाच्या दुकानाला भेट दिली. रुपाली हा वैशिष्ट्यपूर्ण चहा कशी बनवते याची माहिती घेत त्यांनी चहाचा आस्वादही घेतला. केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊनही पदरी निराशा पडल्यानंतर खचून न जाता उद्योजकता अंगी बाणवणाऱ्या रुपाली शिंदेचे अजितदादांनी कौतुक केले आहे.

‘माऊली चहा कट्टा’ या नावाने सुरु झालेल्या या चहाच्या ब्रँडच्या नाशिक शहरात अनेक शाखा स्थापन करुन आपला व्यवसाय विस्तारण्याचा मानस रुपालीने बोलून दाखवला आहे. सध्या तिच्या या चहा कट्ट्यावर दररोज सुमारे पाचशे चहांची विक्री होते. सुशिक्षितांना नोकरी मिळत नसेल तर त्यांनी मानसन्मान मिळवून देणारा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याकडेही लक्ष दिलं पाहिजे, असा प्रेरणादायी सल्लाही तिने दिला आहे.