09 August 2020

News Flash

अंगणवाडी सेविकांना ‘स्मार्ट’ समस्या

मोबाइलच्या अ‍ॅप्लिकेशन सेंटरमध्ये माहिती भरली जात नसल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले.

|| निखिल मेस्त्री

राज्य शासनाने दिलेल्या मोबाइलमध्ये अनेक त्रुटी; अ‍ॅपमध्ये माहिती भरली जात नसल्याची तक्रार :- आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या गरोदर माता, स्तनदा माता, बालके याची माहिती शासनाला कळवण्यााठी अंगवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले. या मोबाइमध्ये कॉमन अ‍ॅप्लिकेशन सेंटरची (कॅस) सुविधा देण्यात आली असली तरी या मोबाइल संचामध्ये अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी अंगणवाडी सेविकांनी केल्या आहेत. मोबाइलच्या अ‍ॅप्लिकेशन सेंटरमध्ये माहिती भरली जात नसल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले.

राज्यात १ सप्टेंबरपासून पोषण अभियान सुरू झाले आहे. त्याचे रियल टाइम मॉनिटरिंग करण्यासाठी तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या अनेक योजनांची अंगणवाडीतील कार्यक्षेत्राअंतर्गतची माहिती ऑनलाइन भरण्यासाठी जिल्यातील महिला बालविकास प्रकल्पांतर्गत ३ हजार १८३ अंगणवाडी सेविकांना पॅनासोनिक कंपनीचे एलुगा-आय ७ प्रकारचे मोबाइल देण्यात आले आहेत. मात्र या मोबाइलमध्ये त्रुटी असून त्यात असलेल्या सॉफ्टवेअरमध्येही अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास येत आहे. या अ‍ॅपमध्ये माहिती योग्यरित्या भरण्यात येत नाही.  या अ‍ॅप्लिकेशन सेंटरच्या मध्यवर्ती डाटा सेंटरची क्षमता कमी असल्याने अंगणवाडी सेवकांनी भरलेली माहिती मध्यवर्ती ठिकाणी पाठवता आणि गोळा होत नसल्याचे कळते. अशामुळे या प्रकल्प कार्यालयांमध्ये व जिल्हा कार्यालयात ही माहिती   संगणकांवर दिसत नाही. अंगणवाडी सेविकांची त्यांच्या कामाच्या आधारे त्यांची हजेरी लावण्यात यावी, असे परिपत्रक एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या संचालकांनी काढले होते. मात्र या कॉमन अ‍ॅप्लिकेशन सेंटरमध्ये अनेक त्रुटी असल्याने हे कामही करता येणे शक्य नसल्याने अंगणवाडी सेविकांनी सांगितले.

कुटुंब व्यवस्थापन निगडित असलेली माहिती, अंगणवाडीच्या मुलांसोबत सेल्फी काढून ती अपलोड करणे, गृहभेटी दिल्यानंतर त्यासंदर्भातली माहिती, स्तनदा माता, अंगणवाडीच्या बालकांची देखरेख ,वजन, मोजमाप, पोषण आहार आदी विविध माहिती अंगणवाडी सेविकांना या मोबाइलच्या कॉमन अ‍ॅप्लिकेशन सेंटरमध्ये भरायची आहे.

दुरुस्ती केंद्र बोईसरमध्ये

अंगणवाडी सेविकांना देण्यात येणारे मोबाइल गरम होऊन बंद पडत आहे. काही ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे त्यामध्ये माहिती भरण्यास अनेक अडचणी येत असल्याचे अंगणवाडी सेवकांनी म्हटले आहे. हे मोबाइल बिघडल्यास त्यासाठी बोईसर येथे एक दुरुस्ती केंद्र ठेवण्यात आलेले आहे. जिल्यातील कोणत्याही भागत हे मोबाइल नादुरुस्त झाले तर ते बोईसर येथेच दुरुस्तीसाठी आणावे लागतात. मात्र मोबाइलच्या दुरुस्ती केंद्रात नादुरुस्त मोबाइल ठेवल्यानंतर तो लगेच दुरुस्त करून मिळेल याचीही खात्री नाही.

नेटवर्क नसल्याचा फटका

वाडा, तलासरी, कासा, जव्हार, मोखाडा परिसरातील ग्रामीण व दुर्गभ भागांत या मोबाइलला नेटवर्क नसल्याने माहिती गोळा करून ती सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात अडचणी येतात. नेटवर्क नसल्याने त्यात भरली जाणारी माहिती अ‍ॅप्लिकेशनवर योग्यरित्या भरली जात नाही. परिणामी मध्यवर्ती कार्यालयाठिकाणी ती माहिती दिसत नाही. त्याचा त्रास साहजिकच सेवकांना होत आहे.

रिचार्ज शुल्कात वाढ

मोबाइल नेटवर्क कंपन्यांनी रिचार्ज शुल्कामध्ये वाढ केल्याने त्याचा फटका बसत आहे. अंगणवाडी सेविकांना या मोबाइलच्या रिचार्जसाठी १६०० रुपये शासनामार्फत दिले जात होते. रिचार्ज शुल्क २३०० रुपये भरावे लागत असल्याने अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली.

अंगणवाडी सेविकांना पुरवण्यात आलेल्या मोबाइलची कंपनी बंद झालेली आहे. या मोबाइलचे सव्‍‌र्हिस सेंटरही नाही. त्यामुळे त्यांच्याकडून शासनाने हे मोबाइल परत करून अंगणवाडी सेविकांना अद्ययावत टॅब देण्यात यावेत. – राजेश सिंग, सचिव, राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

अंगणवाडी सेविकांना कॉमन अ‍ॅप्लिकेशन सेंटरमध्ये काम करताना येणाऱ्या अनेक अडचणी व नेटवर्क संदर्भातील त्रुटी मुख्य सेविकामार्फत प्रकल्पाकडे आणि प्रकल्पामार्फत जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात येतात. जिल्हा कार्यालय या त्रुटी सोडवण्याच्या दृष्टीकोनातून आयुक्त कार्यालयाला पुढील कार्यवाहीसाठी पाठवतात. – दीपक पिंपळे, प्रकल्पधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प, पालघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2019 12:53 am

Web Title: anganwasi worker smart problem akp 94
Next Stories
1 वसतिगृह प्रवेशापासून आदिवासी विद्यार्थी वंचित
2 यूटय़ुबवरून प्रशिक्षण घेत हायटेक चोरी
3 पालघर, वसईत दारूच्या भट्टय़ा उद्ध्वस्त
Just Now!
X