21 November 2017

News Flash

..अखेर अनिल गोटेंनी हट्टाप्रमाणे केलेच

विरोधकांची सभा होऊ न देण्याची खेळी अयशस्वी

वार्ताहर, धुळे | Updated: May 20, 2017 2:45 AM

अनिल गोटे

विरोधकांची सभा होऊ न देण्याची खेळी अयशस्वी; गोटे-कदमबांडे संघर्षांत वाढ

मुख्यमंत्र्यांची सभा पांझरा नदीपात्रात घेण्याचे आमदार अनिल गोटे यांनी जाहीर केल्यावर विरोधकांनी सभा होऊ न देण्याच्या दृष्टिने प्रयत्न केले. परंतु, सभा पांझरेच्या पात्रातच होईल, या हट्टाला पेटलेल्या गोटे यांनी अखेर सभा पांझरा पात्रातच घेऊन दाखवली.

गोटे यांनी आजवर केलेले कोणतेही काम विनाटिकेशिवाय झालेले नाही. मुख्यमंत्र्यांची सभा घेण्यासाठी गोटे यांनी पुढाकार घेताच सभा होऊ न देण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न सुरू केले. नदीपात्राचे विद्रुपीकरणापासून बेकायदेशीर कामांचा प्रारंभ मुख्यमंत्री करणार काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सभेच्या व्यासपीठावर स्थान दिल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा दिला गेला. विरोधकांनी असे सर्व पर्याय वापरल्यानंतरही गोटे यांनी आपणास जे करायचे ते केलेच. महापालिका गोटे यांच्या कट्टर विरोधकांच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. राजवर्धन कदमबांडे यांच्या अंगुलीनिर्देशावर महापालिकेचे प्रशासन चालते असा आरोप गोटे यांच्यामार्फत सतत होतो. राष्ट्रवादीचाच महापौर असल्याने साहजिकच या आरोपाला पुष्टी मिळते. ठेकेदारी पद्धतीने कामे वाटपात जणू स्पर्धेत राहिलेल्या ठराविक व्यक्ती आणि संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यातच कदमबांडे हे धन्यता मानत असल्याचा आरोप त्यांच्यावर कायम होतो.

गोटेंच्या कामांना वारंवार विरोध करून फायदा तर, नाहीच केवळ तोटाच वाटय़ाला येण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीने परीक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे. दुसरीकडे गोटे समर्थक चौपाटी हलविण्याचे वातावरण कायम ठेवण्यात राजकीय फायदा असल्याचे लक्षात घेऊन तसा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. शहरवासीयांच्या चौपाटीबद्दलच्या भावना तीव्र करून त्याचा राजकीय लाभ मिळविण्याचे डावपेच आखले जाऊ शकतील. त्यामुळेच गोटे-कदमबांडे संघर्ष भविष्यात कोणते वळण घेईल हे सध्यातरी सांगणे कठीण आहे.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ

कदमबांडे विरुद्ध गोटे हा संघर्ष अधिकाधिक पेटता ठेवून स्वार्थासाठी त्याचा वापरही काही जणांकडून होतो. कदमबांडेंच्या माध्यमातून गोटे यांच्या विरुद्धचे कागदपत्र मिळवायचे आणि आपण कदमबांडे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत असल्याचे वातावरण निर्माण करण्याची मतलबी हातोटी काहींनी वापरली आहे. दोघांमधील संघर्षांतून तिसऱ्या प्रवृत्तीचा लढा मात्र सोपा होत आहे.

First Published on May 20, 2017 2:45 am

Web Title: anil gote marathi articles