केंद्रातील एनडीए सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यामध्ये सातत्याने बैठका सुरू आहेत, पण त्यातून अद्यापही तोडगा निघालेला नाही. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली असून देशभरात बंद पाळला जात आहे. या बंदच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

“मी सर्व भारतीयांना आवाहन करतो की सध्या जे आंदोलन दिल्लीत सुरू आहे, ते आंदोलन संपूर्ण भारतभरात परसण्यासाठी साऱ्यांनी सहभागी व्हा. केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. असं घडलं तरच सरकारवर दडपण येईल. पण रस्त्यावर उतरून आंदोलन करताना एका गोष्टीचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे की कोणत्याही प्रकारचा हिंसक प्रकार घडून द्यायचा नाही. सरकार केवळ आश्वासनं देतं पण मागण्या कधीच पूर्ण करत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मी आधीही पाठिंबा दिला होता आणि आताही पाठिंबा देत राहीन”, अशा  शब्दात राळेगणसिद्धी येथे बोलताना अण्णा हजारेंनी आपली भूमिका मांडली.

आणखी वाचा- Bharat Bandh: संजय राऊतांचं थेट नरेंद्र मोदी, अमित शाह यांना आव्हान, म्हणाले…

आणखी वाचा- …तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “शेतकरी आज रस्त्यावर आहे. जो शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, त्याला कोणतंही राजकीय पाठबळ नाही हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने समजून घेतलं पाहिजे. आपण विरोधी पक्षनेते म्हणून आपण काय भूमिका मांडत आहोत याचा त्यांनी विचार केला पाहिजे. आज शेतकरी रस्त्यावर आहे. तो स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलण्यास का तयार झाला आहे? याचा राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने सरकारने विचार केला पाहिजे.”