नगर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारी विश्रामगृहावर दिले. तातडीने निर्णय न घेतल्यास जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पिकांचे तातडीने पंचनामे करून १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचे कर्ज व वीजबिल माफ करावे, दुधाला प्रतिलीटर ३० रु. हमीभाव द्यावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व इतर शुल्क माफ करावे, जिल्हय़ात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करावा, रोहयोची कामे तातडीने उपलब्ध करावीत, राहुरी, नेवासे, पाथर्डी व शेवगावमधील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने मुळा धरणाचे आवर्तन सोडावे, मागणी असेल तेथे पिण्यासाठी टँकर द्यावेत, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, जि.प. अध्यक्ष मंजूषा गुंड, आ. संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, पांडुरंग अभंग, सभापती मीरा चकोर, सुनील गडाख, सोमनाथ धूत आदी उपस्थित होते.