अंधश्रद्धा व बुवाबाजी यांसारख्या अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध खंबीरपणे लढणारे ज्येष्ठ कार्यकर्ते, विवेकवादाच्या चळवळीतील अग्रणी आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर मंगळवारी सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेने पुरोगामीत्त्वाचा झेंडा मिरविणाऱ्या महाराष्ट्रावर मोठा कलंक लावला आहे.
 डॉ. दाभोलकर सकाळी साडेसातच्या सुमारास शिरस्त्याप्रमाणे प्रभातफेरीवर जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पाठीमागून त्यांच्या डोक्यावर व बरगडीत गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हे ठिकाण शनिवार पेठ पोलीस चौकीपासून पन्नास पावलांवर आहे. घटना घडली तेव्हा जवळच पोलिसांनी नाकेबंदी केली होती. या घटनेच्या निषेधार्थ सर्व पक्षांनी बुधवारी पुणे बंद पुकारला आहे.
‘‘हल्लेखोरांच्या मोटारसायकलचा क्रमांक पोलिसांना मिळाला आहे. हा क्रमांक, हल्लेखोरांचे वर्णन आणि जवळपासच्या सीसीटीव्ही चित्रीकरणावरून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर २५ ते ३० वर्षे वयोगटातील होते. हत्येमागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही, मात्र पोलीस सर्व दृष्टीने तपास करत आहेत. हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे,’’ अशी माहिती पुण्याचे पोलीस सहआयुक्त एस. के. सिंघल यांनी दिली. या हत्येबाबत रात्रीपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.
पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दाभोलकर यांचे पार्थिव रुग्णालयापासून साधना मीडिया केंद्रापर्यंत नेण्यात आले. प्रचंड मोठय़ा संख्येने जनसमुदाय या वेळी या पार्थिवयात्रेत सहभागी झाला होता. साधना मीडिया केंद्रात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तिथे अनेकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी साताऱ्याला नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.