अडीच पटीने वाढ; वाढीव दराने संच खरेदी करण्यास प्रशासनाची मान्यता

पालघर : प्रतिजन चाचणी संचाचे दर अडीच पटीने वाढल्याने पालघर जिल्ह्यात सुरू  करण्यात आलेल्या प्रतिजन चाचणी मोहिमेत काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. जिल्ह्यतील प्रतिजन चाचणी संच उपलब्धतेची समस्या निर्माण झाली असून नवीन वितरकांकडून हे संच मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहेत.

पालघर जिल्ह्यत फक्त १५० आरटीपीसीआर नमुन्यांची चाचणी करण्याची सुविधा आहे. त्यामुळे विविध भागांतून गोळा होणारे आरटीपीसीआरचे ८०० ते एक हजार नमुने मुंबई येथील विविध प्रयोगशाळांमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात येतात. त्याचे अहवाल प्राप्त होण्यास चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती यादरम्यान गंभीर होत आहे. यामुळे गावांमध्ये प्रतिजन चाचणीची शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. दररोज ३५०० ते ३८०० प्रतिजन चाचण्या होत असून त्यामध्ये सरासरी ६०० ते ८०० नागरिकांना आजाराचा संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे.

पालघर जिल्ह्याने २० हजार प्रतिजन तपासणी संचाची मागणी केली असून लवकरच प्राप्त होतील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेला रुग्णवाढीचा वेग मंदावत नाही तोपर्यंत प्रतिजन चाचण्या वेगाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. गेल्या आठवडय़ात जिल्ह्यात सुमारे २२ हजार करोना चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये ४८२४ नागरिकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. या मोहिमेमुळे आजाराच्या संसर्गावर व संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यात मदत होणार आहे. रुग्णांना लवकरात लवकर उपचार सुरू केल्याने रुग्णांचे गंभीर होण्याचे प्रमाण नियंत्रणात येईल असेही डॉ. सूर्यवंशी म्हणाले. करोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर आरोग्य व्यवस्थेचे तसेच समाजाचे लक्ष राहत असल्याने त्याचा परिणाम रुग्ण दरवाढ कमी होण्यावर होईल, असे विश्वास जिल्हा आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

संचाची किंमत ५६ वरून १४० रुपये

पूर्वी ५६ रुपयांत उपलब्ध होणाऱ्या प्रतिजन तपासणी संचाची किंमत १४० रुपयांवर पोहोचली आहे. या वाढीव दराला ‘आयसीएमआर’ने मान्यता दिली आहे. परिणामी जुन्या दराने पालघर जिल्ह्यला पुरवठा करणाऱ्या वितरकाने प्रतिजन चाचणी संच जिल्ह्यला पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली आहे. मोहीम सुरू ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने वसई- विरार महानगरपालिकेकडून सात हजार प्रतिजन चाचणी संच परत देण्याच्या हमीवर घेतले असून वाढीव दराने प्रतिजन संच खरेदी करण्यास प्रशासनाने मान्यता दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्याकडे विचारणा केली असता सांगितले.