नगर : कडक र्निबध व संचारबंदी लागू असतानाही नगर शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना आता अँटीजेन चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने पत्रकार वसाहत चौक व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चौक या दोन ठिकाणी केंद्र सुरू केली आहेत. यातील पत्रकार वसाहत चौकातील केंद्रावर आज, शनिवारी सायंकाळपासून या चाचणीला सुरुवात करण्यात आली.
पत्रकार वसाहत चौकातील केंद्रावर आज सायंकाळी सात जणांची चाचणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल नकारात्मक आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोडगे यांनी दिली. डीएसपी चौकातील केंद्र उद्या, रविवारपासून कार्यान्वित होत आहे.
दोन दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी करोना परिस्थितीचा नगरमध्ये आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी विनाकारण रस्त्यात फिरणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. आज दुपारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही याबाबत आदेश दिले होते.
या संदर्भात माहिती देताना आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनी सांगितले की, पत्रकार वसाहत चौक व डीएसपी चौक येथे मनपा कर्मचाऱ्यांसमवेत पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. या केंद्रावर एक तंत्रज्ञ व एक डाटा ऑपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत.
नगर शहर व ग्रामीण भागातील जे नागरिक विनाकारण फिरत आहेत, त्यांची चाचणी केली जाईल.
या केंद्राच्या ठिकाणीच एक रुग्णवाहिका तैनात केली जाणार आहे. चाचणी अहवाल सकारात्मक आल्यास त्या बाधितांची रवानगी कोविड केअर सेंटरमध्ये केली जाईल. लक्षणे नसणाऱ्या बाधितांना गृह विलगीकरणात राहण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यांना कोविड केअर सेंटरमध्येच राहावे लागणार आहे.