News Flash

काँग्रेस कार्यकर्त्यांची अंतुलेंच्या भू्मिकेने अडचण

आपली उभी हयात शेकापविरोधात लढणाऱ्या बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना अचानक शेकापचा पुळका आला आहे.

| March 27, 2014 01:01 am

आपली उभी हयात शेकापविरोधात लढणाऱ्या बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना अचानक शेकापचा पुळका आला आहे. मात्र आपल्या उतारवयात अंतुलेंना ही उपरती का झाली असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. अंतुले यांच्या भूमिकेमुळे जिल्हा काँग्रेस कमिटीची मात्र चांगलीच अडचण झाली आहे.
ज्या काँग्रेस पक्षाने अंतुले यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले, केंद्रीय मंत्रिमंडळात प्रदीर्घ काळ मंत्रिपद उपभोगण्याची संधी दिली त्याच पक्षावर टीका करण्याची उपरती अंतुले यांना झाली आहे. अचानक ही परिस्थिती का उद्भवली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून अंतुले आणि वाद हे एक समीकरणच बनले आहे.
२६-११च्या हल्ल्यातील शहिदांबद्दल आपल्या बेजबाबदार वक्तव्यामुळे ते यापूर्वी अडचणीत आले होते. याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या बेजबाबदार वक्तव्यामुळे त्यांना मतदारांच्या रोषाला सामोर जावे लागले होते. खासदारकीच्या पाच वर्षांत मतदारसंघाकडे फिरवलेली पाठ आणि उलटसुलट वक्तव्ये यामुळे गेल्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता.  
आपल्या पराभवाचे खापर त्यांनी सुनील तटकरे यांच्या माथी मारले होते. मात्र या पराभवानंतरही अंतुले यांनी धडा घेतला नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अंतुले हे तटकरे यांचे राजकीय गुरू असले तरी गेल्या काही वर्षांत दोघांमध्ये चांगलेच मतभेद निर्माण झाले होते. तटकरेंच्या जिल्ह्य़ात सातत्याने वाढणारा प्रभाव  हा या मतभेदामागचा मुख्य मुद्दा होता. गेली चार दशके रायगडच्या राजकारणात अंतुले यांची मक्तेदारी तटकरे यांनी संपुष्टात आणली होती. याचे शल्य अंतुले यांना खुपत होते. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आपली राज्यसभेवर वर्णी लागून राजकीय पुनर्वसन होईल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या या अपेक्षा धुळीला मिळवल्या होत्या. राजकीय पुनर्वसन तर सोडाच पाच वर्षांत त्यांची साधी विचारपूसही केली नाही. रायगडचा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चाही केली गेली नाही. त्यामुळे त्यांच्या याच नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न शेकापच्या जयंत पाटील यांनी केला आणि तो प्रयत्न खूपच यशस्वी झाला.
अंतुले यांच्या मनात असणारी सल बाहेर आली आणि ज्या राजकीय पक्षांनी त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली त्याच पक्षावर टीकेची झोड उठवण्यास त्यांनी सुरुवात केली. मात्र हे करत असताना त्यांनी ज्या शेकापशी हातमिळवणी केली त्याच शेकापने त्यांचे मुख्यमंत्रिपद एके काळी अडचणीत आणले होते. सिमेंट घोटाळा प्रकरणात त्यांची गाडी अडवून पोलिसांना तपासणी करण्याची वेळ शेकाप नेत्यांनी आणली होती. याचा विसर त्यांना पडला.
ज्या शेकापविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आजवर लढा दिला. त्याच शेकापला मदत करा असा सल्ला ते देऊ लागले आहेत. मात्र त्यांचा सल्ला मानायचा तरी कसा? हा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. अंतुले यांचे रायगडसाठी असणारे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. पण म्हणून आपण २५ वर्षांपूर्वी केलेल्या कामाचे दाखले देऊन ते मतदारसंघावरचे वर्चस्व कायम ठेवूशकत नाहीत. तटकरे यांच्यामुळे जिल्ह्य़ात काँग्रेस पक्षाची काही प्रमाणात गळचेपी होत आहे. मात्र म्हणून शेकापला मदत करा, असा सल्ला जर अंतुले देत असतील तर तो पक्षातील नेत्यांनी मानायचा कसा? याचे उत्तर मात्र त्यांना सापडत नाही. त्यामुळे अंतुले यांच्या भूमिकेने जिल्हा काँग्रेस कमिटीची चांगलीच अडचण केली आहे हे मात्र नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 1:01 am

Web Title: antulay dares congress supports opposition nominee in raigad
Next Stories
1 शेतकरी विरोधी लोकांना मतदान करणार का?
2 शेतकरी विरोधी लोकांना मतदान करणार का?
3 ‘शिर्डी’वरून बौद्ध समाजात नाराजी
Just Now!
X