सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे व भाजपचे अॅड. शरद बनसोडे यांच्यासह ४६ उमदेवारांचे अर्ज छाननीत मंजूर झाले, तर तिघा अपक्षांचे अर्ज फेटाळण्यात आले. शिंदे व बनसोडे या दोघांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत महायुतीचे बंडखोर उमेदवार प्रमोद गायकवाड (रिपाइं) यांनी घेतलेले आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले. माढय़ात राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील व महायुतीचे सदाशिव खोत यांच्यासह ३२ उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले. तर तिघा अपक्षांचे अर्ज नामंजूर झाले. दोन्ही मतदारसंघांमध्ये अपक्षांची भाऊगर्दी झाली आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी होऊन त्यात विविध राजकीय पक्षांच्या जवळपास सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व भाजपचे बनसोडे या दोघाही प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या जातीच्या प्रमाणपत्रांविषयी महायुतीचे बंडखोर उमेदवार तथा रिपाइंचे माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी हरकत घेतली होती. यासंदर्भात गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात आपल्या बाजूने निकाल लागल्याचा दावा गायकवाड यांनी केला असता त्यांचे म्हणणे ग्राह्य़ धरले गेले नाही. वैध अर्जामध्ये काँग्रेसचे शिंदे व भाजपचे बनसोडे यांच्यासह ‘आप’चे ललित बाबर, बसपाचे अॅड. संजीव सदाफुले, महायुतीचे बंडखोर प्रमोद गायकवाड यांचा समावेश आहे. अर्ज फेटाळले गेलेल्या अपक्षांपैकी संतोष कटके-पाटील यांनी उमेदवारी अर्जासोबत अनामत रक्कम भरली नव्हती. तर पवडय्या स्वामी यांनी जातीचा दाखला सादर केला नव्हता.
माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे प्रतिस्पर्धी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाशिव खोत यांच्यासह अपक्ष प्रतापसिंह मोहिते-पाटील, महायुतीचे बंडखोर स्वरूप जानकर (रासप), ‘आप’च्या अॅड. सविता शिंदे, बसपाचे कुंदन बनसोडे, प्रफुल्ल कदम (अपक्ष)आदी उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत. एकूण ३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी तिघांचे अर्ज बाद झाले. येत्या २९ मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Mar 2014 रोजी प्रकाशित
सोलापुरात ४६ तर माढय़ात ३२ अर्ज छाननीत मंजूर
सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे व भाजपचे अॅड. शरद बनसोडे यांच्यासह ४६ उमदेवारांचे अर्ज छाननीत मंजूर झाले, तर तिघा अपक्षांचे अर्ज फेटाळण्यात आले.
First published on: 27-03-2014 at 03:24 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Application approved in analysis 46 in solapur and 3 in madha