लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्य़ातील उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. चौदा कुंडांसह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगा चांगल्या प्रकारे प्रवाहित आहे.
सुमारे वर्षभरापूर्वी निर्गमन झालेल्या गंगामाईचे २९५ दिवसांनी आगमन झाले आहे.
गेल्या वर्षी २५ एप्रिलला आगमन झालेल्या गंगामाईने साठ दिवसांच्या वास्तव्यानंतर २४ जून रोजी निर्गमन केले होते. त्यानंतर २९५ दिवसांनी, बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती गंगा देवस्थानचे श्रीकांत घुगरे यांनी दिली.
आगमनानंतर गंगामाई चांगली प्रवाहित असून सर्व कुंडांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले आहे. गायमुखही सध्या प्रवाहित आहे.
गंगामाईच्या पाण्याने पवित्र स्नान करण्यासाठी राज्यासह राज्याबाहेरील भाविक मोठय़ा संख्येने गंगेच्या वास्तव्याच्या काळात या ठिकाणी येतात. मात्र, यावर्षी करोनाच्या संसर्गामुळे गंगामाईच्या पवित्र पाण्याने स्नान करण्याची संधी हुकण्याची शक्यता आहे.