पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने सारंग पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे संतप्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे इच्छुक असणारे अरुण लाड बंडखोरीच्या तयारीत असून, गुरुवारी पाच जिल्ह्यांतील समर्थकांचा मेळावा कुंडल येथे आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देण्याची तयारी गेल्या निवडणुकीवेळीच अरुण लाड यांना पक्षश्रेष्ठींनी दर्शविली होती. उमेदवारी मिळेल या अपेक्षेने लाड समर्थक कार्यकर्त्यांनी पाचही जिल्ह्यांत पदवीधर मतदारांची नोंदणी जास्तीतजास्त होण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी डावलून सारंग पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिल्याची घोषणा करण्यात आली.
पदवीधर मतदारसंघासाठी ५ लाख ९३ हजार ७०७ मतदार असून, ३ जूनपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १ लाख ६६ हजार ८२१, कोल्हापूर १ लाख ३१ हजार ९४६, सांगली १ लाख ४१ हजार ८६७, साताऱ्यामध्ये ८६ हजार ९१६ आणि सोलापूरमध्ये ६६ हजार १५७ इतकी मतदारसंख्या आहे.
पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक अधिसूचनाही मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी जारी केली आहे. या निवडणुकीसाठी पदवीधर गटातून भाजपचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे पुन्हा मदानात उतरले असून, राष्ट्रवादीने सारंग पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय धमेंद्र पवार हेसुद्धा अपक्ष म्हणून रिंरगणात उतरणार आहेत. शिक्षक मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने शिक्षक संघाचे विद्यमान आमदार भगवानराव साळुंखे यांना पुन्हा संधी दिली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी ६६ हजार ११० मतदार असून सर्वाधिक मतदार सोलापूर जिल्ह्यात १८ हजार ६९३ इतकी आहे. पुण्यामध्ये १८ हजार ४२६, साता-यात १५ हजार ५५९, सांगलीत ९ हजार ३५८ आणि कोल्हापुरात ८ हजार ७६४ इतकी मतदारसंख्या आहे.