माजी मुख्यमंत्री व नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार अशोक चव्हाण यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीप्रमाणे सादर केलेल्या निवडणूक खर्चाची छाननी करून निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना खर्चामध्ये आणखी साडेबारा लाख रुपये समाविष्ट करायला लावले आहेत. त्यापैकी ४ लाख ५ हजार रुपयांचा खर्च जाहिराती व अभिन्न बातम्यांशी संबंधित आहे. प्रचलित भाषेत त्यातील काही खर्च पेडन्यूजमध्ये मोडतो.
२००९ च्या विधानसभा निवडणूक खर्च प्रकरणी निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला सामोरे जाण्यापूर्वी चव्हाण यांनी गेल्या गुरुवारी (१२ जून) जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपल्या निवडणूक खर्चाचे विवरण सादर केले. निवडणूक प्रचार काळात त्यांच्या दैनंदिन खर्चाची निवडणूक यंत्रणेकडून छाननी होत होती. जाहीर सभा, रॅली, मिरवणुका, वाहने तसेच जाहिराती, प्रसिद्धी आदी वेगवेगळ्या बाबींवर त्यांनी दाखविलेल्या खर्चात निवडणूक यंत्रणेने साडेबारा लाख रुपये समाविष्ट केल्यानंतर त्यांच्या अंतिम निवडणूक खर्चाचा आकडा ५५ लाख ४४ हजार ८३१ रुपयांवर गेला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील नांदेड मतदारसंघातल्या उमेदवारांचा निवडणूक खर्च संकेतस्थळावर झळकला आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला खर्च मर्यादा ७० लाख रुपये होती. निवडणुकीत विजयी झालेल्या अशोक चव्हाण यांच्याकडे निवडणुकीसाठी स्वनिधी १ लाख १ हजार होता, तर त्यांना पक्षाने ६५ लाख रुपये दिले, असे त्यांनी आपल्या विवरण पत्रातील भाग-३ मध्ये नमूद केले आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या खर्चात चव्हाण यांनी इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमातील जाहिरातींवरचा खर्च जेमतेम ११ हजार रुपये दाखविला होता. त्याची चिरफाड करून ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचा पंचनामा केला होता. या पाश्र्वभूमीवर चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक काळात त्यांच्या वतीने विविध वृत्तपत्रात दिलेल्या सर्व जाहिराती व त्यावरील खर्चाचा सविस्तर तपशील सादर केला. हा खर्च १ लाख ९५ हजार २९४ रुपये आहे. पण निवडणूक काळात वेगवेगळ्या अमराठी भाषिक व काही मराठी वृत्तपत्रांमध्ये चव्हाण यांच्या संबंधाने प्रसिद्ध झालेल्या अभिन्न बातम्या तसेच काही जाहिरातींची नोंद घेऊन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या खर्चात आणखी ४ लाख ५ हजार ३८८ रुपये समाविष्ट केले. त्याला ‘नोशनल एक्स्पेंडिचर’ असे संबोधण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा जाहिराती व प्रसिद्धीवरील खर्च ६ लाखांवर गेला. या निवडणुकीनंतर चव्हाण यांच्या खर्चाची अत्यंत बारकाईने छाननी झाली, असे सांगण्यात आले. निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २२ जणांनी विहित मुदतीत निवडणूक खर्चाचे विवरणपत्र दाखल केले आहे. आपचे उमेदवार नरेंद्रसिंग ग्रंथी यांच्याकडून शपथपत्र व खर्चाचे विवरण विहित मुदतीत दाखल झाले नाही.
भाजप उमेदवार डी. बी. पाटील यांचाही निवडणूक खर्चाचा तपशील उपलब्ध झाला असून या निवडणुकीत त्यांनी ३५ लाख ६६ हजार ७१४ रुपये खर्च केले. त्यापैकी २५ लाख रुपये त्यांना पक्षाकडून प्राप्त झाले. ९ लाख ९९ हजार रुपये त्यांनी कर्ज स्वरूपात उभे केले, तर त्यांचा स्वत:चा खर्च ६६ हजार ७७१ रुपये इतका आहे. डी. बी. पाटील यांनी वृत्तपत्रीय जाहिरातींवर ३ लाख ४१ हजार ९५० रुपये खर्च केले. त्यांच्या प्रचारार्थ भाजपाचे स्टार नेते नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. त्या सभेचा खर्च १ लाख ६५ हजार ८८३ रुपये दाखविण्यात आला आहे.