दोनशे किलोमीटर पायपीट करत हजारो शेतकऱ्यांनी एक लाँग मार्च काढला होता. मात्र आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी हजारोंच्या संख्येने मुंबईत आलेल्या गरीब शेतकऱ्यांच्या हाती सरकारने शेवटी ‘लेखी जुमला’च दिला आहे. अशी प्रखर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. औपचारिकता म्हणून सरकारने शेतक-यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून शेतक-यांच्या काही मागण्या मान्य केल्या असे लेखी आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात हे आश्वासन म्हणजे केवळ लेखी जुमला आहे असे चव्हाण म्हणाले.

चव्हाण म्हणाले, हजारो शेतक-यांचा किसान लाँग मार्च मुंबईत धडकल्यावर झोपलेल्या सरकारला जाग आली आणि सरकारने शेतक-यांना चर्चेसाठी बोलावले. गेल्या सहा दिवसांपासून हे शेतकरी रखरखत्या उन्हात उपाशीपोटी मुंबईच्या दिशेने निघाले होते. पाय रक्तबंबाळ झाले तरीही आपल्या मागण्या मान्य होतील या आशेपोटी ते चालत होते. पण सरकारला या विषयाचे अजिबात गांभिर्य नाही. त्यामुळे भाजपच्या खासदारांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना ‘शहरी माओवादी’ म्हटले तर मुख्यमंत्र्यांनी या मोर्चात सहभागी झालेले ९५ टक्के लोक शेतकरी नाहीत असे म्हणत शेतक-यांची हेटाळणी केली. यातही भर म्हणून की काय भाजपच्या पेड ट्रोल्सनी समाज माध्यमातून या किसान लाँग मार्चची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

८९ लाख शेतक-यांचे ३४ हजार कोटींचे कर्ज माफ करणार असे सरकारने जाहीर केले होते. मात्र या कर्जमाफीच्या वर्षांमध्ये घोळ घालत सरकारने शेतकऱ्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने हा बनाव लक्षात आणून देत पाठपुरावा केल्याने कर्जमाफीचे वर्ष निश्चित झाले. अजूनही अर्बन बँका, पतसंस्था,मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलेले शेतकरी कर्जमाफीच्या परिघाबाहेर आहेत. सरकार कर्जमाफीच्या अंमलबजावणीतही चालढकल करित असून सरकारने जाहीर केलेल्या संख्येच्या एक तृतीयांश शेतक-यांनाही अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही असेही त्यांनी सांगितले.

दीड लाखांची मर्यादा काढून सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी या या मागणीवर काँग्रेस पक्ष कायम आहे. तसेच कुटुंबाच्या व्याख्येसंदर्भात, बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतक-यांना मदतीच्या संदर्भात व अन्य मागण्यासंदर्भात सरकारने शेतक-यांना कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही असा आरोपही चव्हाण यांनी केला. विचार करू, समिती नेमू अशा त-हेच्या लेखी आश्वासनांतून शेतक-यांच्या हाती फार काही पडणार नसून हा सरकारचा एक लेखी जुमलाच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. याबरोबरच मागील तीन वर्षापासून शेतक-यांसाठी सुरु असलेला काँग्रेस पक्षाचा लढा सुरुच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.