रायगडच्या नगररचना विभागातील सहाय्यक संचालक किशोर दत्तात्रेय गिरोल्ला (५०) यांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भ्रष्टाचार विरोधी पथकाने शुक्रवारी रंगेहाथ अटक केली. गिरोल्ला यांना सापळा रचून अटक करण्यात आली.

किशोर गिरोल्ला मंत्रालयात शहर विकास विभागात सचिव होते. तिथे असताना त्यांनी मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केला. त्यांचे हे कारनामे कानावर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मंत्रालयातून बदली केली. त्यांच्या जागी प्रदीप गोहील यांची नियुक्ती करण्यात आली.

अलिबाग येथील जागेच्या बांधकामास भोगवटा दाखल्याच्या कामाचा अभिप्राय रिपोर्ट जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे पाठिवण्याकरीता गिरोल्ला यांनी ५० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ते ४० हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले. किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून लाच स्वीकारताना गिरोल्ला यांना अटक केली.