या जिल्ह्य़ातील गोरेगाव पोलीस ठाण्यात पतीच्या खुनाच्या गुन्ह्य़ात अटकेत असलेल्या आरोपी महिलेवर तेथील सहाय्यक फौजदाराने बळजबरी करण्याचा प्रयत्न ९ ऑगस्टच्या रात्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ठाण्यातील महिला पोलिसांच्या सतर्कतेने हा प्रयत्न फसला. या घटनेबाबत पोलीस दलानेही गुप्तता पाळून त्या फौजदारावर गुन्हा दाखल न करता त्याला १६ ऑगस्टला निलंबित केले आहे. ग्यानिराम जिभकाटे (बक्कल नं.९९) असे त्याचे नाव आहे.
विशेष म्हणजे, अशाच एका प्रकरणात यापूर्वीही त्याच्यावर कारवाई झाली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा त्याला सेवेत नियमित करण्यात आले होते. गोरेगाव तालुक्याच्या जांभळी येथील जंगलात ३१ जुलला बोंडगावदेवी येथील एका विवाहित युवकाचा खून झालेला होता. त्यात इतर दोघांसह आरोपी म्हणून मृत युवकाच्या पत्नीलाही ६ ऑगस्ट २०१६ रोजी अटक झाली होती. त्या महिलेला न्यायालयाने २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ती पोलीस कोठडीत तिच्या सुरक्षेसाठी मंजूषा घरडे व घनमारे या महिला पोलीस शिपाई सेवेत होत्या. सोबतच पोलीस ठाण्यात रात्रपाळीत सहाय्यक फौजदार ग्यानिराम जिभकाटे हा होता. आरोपी महिला कोठडीत असताना ९ ऑगस्टच्या रात्री जिभकाटे याने त्या महिलेच्या खोलीचे दार वाजवून तिला उठविले. तुझ्याकडे असलेली मुलगी कुणाची, तिला बापाचा दर्जा मी देईन, यासाठी तू माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित कर, अशी मागणी त्याने केली. त्यानंतर त्या महिलेवर पोलीस ठाण्यातच बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.
पोलीस ठाण्यातच दोन महिला पोलीस कर्मचारी हजर असताना आरोपी महिलेचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या फौजदारावर गुन्हा का दाखल केला नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. पोलीस दलाच्या बदनामीच्या भीतीपोटी गुन्हा दाखल करीत नाही किंवा आरोपीला वाचविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा गोरेगावच्या पोलीस ठाणे परिसरातच आहे. या संदर्भात आज, शनिवारी गोरेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांना विचारल्यावर, निलंबित फौजदारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती त्यांनी लोकसत्ताला दिली.