तोंड आणि पाय बांधलेल्या अवस्थेत किमान 90 भटकी कुत्री मृतावस्थेत आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बुलडाण्याच्या गिरडा-सावळदबारा मार्गाजवळ तोंड आणि पाय बांधलेल्या अवस्थेत भटक्या कुत्र्यांचे मृतदेह इतक्या मोठ्या संख्येने आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुरूवारी उघडकीस आलेल्या या घटनेबाबत रविवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी बुलडाण्यात एकूण १०० भटकी कुत्री तोंड आणि पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. आसपासच्या परिसरात पसरलेली दुर्गंधी असह्य झाल्यानंतर स्थानिकांनी गावातील पोलीस पाटलाकडे तक्रार केली होती. त्यानंतर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली आणि या प्रकाराचा उलगडा झाला. घटनास्थळी पोहोचल्यावर वन अधिकाऱ्यांना तेथे तोंड आणि पाय बांधलेल्या अवस्थेत काही जिवंत कुत्रेही दिसले, पण बहुतांश कुत्री मृतावस्थेत होती. जिवंत कुत्र्यांची तातडीने सुटका करण्यात आली. गिरडा-सावळदबारा मार्गाजवळ वेगवेगळ्या ठिकाणी मृत कुत्र्यांचे शव अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते. सुमारे १०० कुत्र्यांचे तोंड आणि पाय बांधून ५ वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले होते.

वनरक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे रविवारी पोलिसांनी, अज्ञात हल्लेखोराविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम(1960) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याबाबत पुढील तपास सुरू आहे.