अहमदनगर जिल्ह्यातील नेवासामधील सोनई येथील शेतकऱ्यांनी मुळा सहकारी साखर कारखान्यावर व शिवेसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर आरोप करत आपल्या शेतामधील उभा ऊस पेटवून दिला आहे. शंकरराव गडाख यांच्या ताब्यातील साखर कारखाना या शेतकऱ्यांच्या ऊसाला तोड देत नाही, त्यांची नोंद घेतली गेलेली नाही कारण ते विरोधक आहेत, त्यांनी गडाख यांच्याविरोधात पॅनल उभं केलं होतं. म्हणून केवळ राजकीय विरोधातून असं केलं जात असल्याचा या शेतकऱ्याचा आरोप आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्‍या शिवसेनेचे मंत्री शेतकर्‍यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्‍या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही?” असा सवाल फडणवीस यांनी शेतकरी ऊस पेटवून देत असतानाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत शिवसेनेला केला आहे.

तसेच, “आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्‍यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्‍यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्‍यांनी जगायचेच नाही.” असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

“मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवास्यात हा प्रताप चालविला आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ हस्तक्षेप करत या शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, ही माझी माफक अपेक्षा आहे. किमान अन्नदात्याला तरी पक्षीय चष्म्यातून बघू नका!” असंही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शिवसेनेला उद्देशून म्हणत आहे.