अशोक तुपे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लागोपाठ झालेल्या सभांमुळे नगर जिल्ह्य़ाचे राजकारण ढवळून निघाले आहे. पंतप्रधानांनी विकासाच्या मुद्दय़ावर भर देत मतदारांना आपलेसे करण्यावर भर दिला असतानाच ठाकरे यांनी मोदी यांनाच आव्हान दिले. शिवसेनेच्या सभांना झालेल्या गर्दीमुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. या दोन्ही सभांचा आपापल्या लोकसभेच्या जागा कायम राखण्याकरिता वापर करून घेण्याचा भाजप आणि शिवसेनेचा प्रयत्न आहे.

साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप शिर्डी येथे पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. साईबाबा संस्थानचा हा कार्यक्रम असला तरी राज्य सरकारने त्यात घुसखोरी करून पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थीना घरकुल वाटपाचा प्रातिनिधिक कार्यक्रम ठेवला. तर भारतीय जनता पक्षाने सभेचा पुरेपूर वापर करून घेतला. साई संस्थान बाजूला तर पडलेच पण सरकारी कार्यक्रमाचे स्वरूप न रहाता त्याला पक्षासाठी आयोजित केलेल्या राजकीय सभेचे स्वरूप आले. त्यामुळे व्यासपीठावर संस्थानचा कार्यक्रम म्हणून उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे, खासदार सदाशिव लोखंडे यांची कोंडी झाली. विखे यांना तर स्वपक्षावरील टीका सहन करावी लागली. पंतप्रधान मोदी यांनी या सभेत आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसवरही तोफ डागली.

मोदी यांच्या सभेसाठी भाजपने सारी तयारी केली होती. मोठय़ा प्रमाणावर उपस्थिती राहील याचे नियोजन केले गेले होते. पण मोदी यांच्या सभेला पूर्वीसारखा प्रतिसाद मिळाला नाही. एवढेच नव्हे तर मोदी यांचे भाषण सुरू असताना शेवटी शेवटी तर काही लोक सभेतून उठूनही गेले. त्याचेच राजकीय भांडवल आता मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने सुरू केले आहे. मोदी यांचा करिश्मा कमी झाला, असा दावा शिवसेनेच्या वतीने केला जात आहे.

मोदी सत्तेवर येण्यापूर्वी केंद्र सरकारची इंदिरा आवास योजना सुरू होती. मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये योजनेचे नामांतर करून पंतप्रधान आवास योजना असे नाव ठेवले. या योजनेत राज्यात २ हजार ८८८ कोटी रुपये खर्च करून २ लाख ४० हजार घरकुले बांधण्यात आली. यापूर्वी सरकारने कधीही घरकुल वाटपाचा कार्यक्रम करून ढोल वाजविले नाही. मात्र प्रथमच लाभार्थीना घरकुलाच्या प्रतीकात्मक चाव्या देण्यात आल्या. खरेतर १९८३ साली ही योजना सुरू करण्यात आली. अनुदानाच्या रकमेत टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. सुरुवातीला ३५ हजार रुपये अनुदान होते. ते ७० हजारांवर नेण्यात आले.

मोदी सरकारच्या काळात हे अनुदान आणखी वाढविण्यात आले. सुमारे दीड लाखापर्यंत अनुदान दिले जाते. योजनेचे लाभार्थी पूर्वी ग्रामसभा ठरवत असे, पण मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करून यादी तयार केली. आता त्यानुसार घरे दिली जात आहेत. लाभार्थीना उज्ज्वला गॅस, शौचालय, आयुष्यमान आरोग्य योजनेचा लाभ दिला जातो. हा लाभ सर्वच लाभार्थीना मिळतो असे नाही. पण मोदी यांनी सुविधायुक्त घरकुलांचा नारा दिला. घरकुलांचे लाभार्थी यापूर्वी काँग्रेसची मतपेढी होती. या मतपेढीला धक्का देण्यासाठी त्यांनी पद्धतशीरपणे प्रयत्न चालविले आहेत.

शिवसेनेचे प्रत्युत्तर

मोदी यांच्या सभेनंतर दोनच दिवसांत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची शिर्डीत सभा झाली. शिर्डीत पहिली सभा घेऊन निवडणुकीचे बिगूल वाजविण्यात आले. वास्तविक भाजप सरकारमध्ये शिवसेना सहभागी आहे. सभेत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले. विशेष म्हणजे मोदी यांच्या घोषणाबाजीला त्यांनी आव्हान दिले. शिर्डीच्या सभेलाही गर्दी होती. तर नगरच्या सभेत गर्दीचा उच्चांक झाला होता. महायुतीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही सभांना पहिल्यांदाच मोठी गर्दी झाली. त्यामुळे शिवसेनेत चैतन्य निर्माण झाले आहे. शिवसेना व भाजपला दोन्ही सभांचा लाभ झाला. मात्र महिन्यापूर्वी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा जिल्ह्य़ातून निघाली. त्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला नव्हता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांच्याही सभा जिल्ह्य़ात झाल्या. तुलनेत सेना भाजपच्या सभांमुळे मात्र त्यांच्या समर्थकांत उत्साह संचारला आहे. नगरची जागा भाजपकडे असून, शिर्डीत शिवसेनेचा खासदार आहे. या दोन्ही जागा उभय पक्ष कायम राखणार का, हा खरा प्रश्न आहे. नगरवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांचा डोळा आहे. पण आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे असून, राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास अजून तरी तयार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कमी झाला, अशी टीका काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. पण शिर्डीच्या सभेने हा करिश्मा कमी झालेला नाही. उलट वाढलेला आहे. हे स्पष्ट होते. सभा राजकीय नव्हती. मात्र सरकारची योजना ही लाभार्थीच्या किती फायद्याची आहे हे यानिमित्ताने पुढे आले. गरीब घटकात त्यामुळे मोदींची प्रतिमा तयार झाली आहे. घरकुल योजनेचा लाभ हा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत मिळेल.

– प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीच्या सभेत घरकुल योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पण आतापर्यंत अनेक योजना फसल्या. काळा पैसा देशात आला नाही. लोकांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा झाले नाहीत. नोटबंदीचा काही फायदा झाला नाही. घरकुल योजनेचेही तसेच आहे. शिर्डीच्या सभेचा भाजपला लाभ होणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी व नगरच्या सभांना झालेली ऐतिहासिक गर्दी हे त्याचे उत्तर आहे.

– प्रा. शशिकांत गाडे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना