विरार :  नालासोपारा परिसरात एका व्यक्तीला रस्त्यावर लघुशंका करू नको असे सांगूनही तो ऐकत नसल्याने त्याची चित्रफीत काढली म्हणून  शिवसेनेच्या विभागप्रमुखाला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा पूर्व येथे राहणारे जितेंद्र हजारे हे बुधवारी संयुक्त नगर या सेना शाखेत होते. यावेळी त्यांनी शाखेच्या बाजूला असलेला दुकानदार हा रस्त्यावर लघुशंका करत असल्याचे पाहिले. त्याने त्याला हटकले तरी त्याने ऐकले नसल्याने त्यांनी त्याची चित्रफीत काढण्यास सरुवात केली. त्या रागातून या दुकानदाराने  व त्याच्या इतर सहकाऱ्यांनी लोखंडी रॉड ने हजारे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. यात शिवसेना विभागप्रमुख गंभीर जखमी झाले असून डोक्याला १८ टाके पडले असून हाताचे बोट ही फ्रॅक्चर झाले आहे.  त्याच्यांवर वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर दुकानदाराचे नाव यादव असून त्यावर आणि साथीदारावर तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.