कारागृहाच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्ताचे काम करणाऱ्या महिला पोलिसावर एका कैद्याने चाकूने हल्ला करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. हल्लय़ात त्या जखमी झाल्या. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात कैद्याविरुद्ध  गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी, जिल्हा कारागृहात सुजाता निवृत्ती शेळके उर्फ सुजाता गोपाल हाडवळे (वय २७) या मुख्य प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी तैनात होत्या.  आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कैदी पावलस कचरु गायकवाड याने कारागृहाच्या स्वयंपाकगृहातील चाकू घेऊन कारागृहातून पळ काढला. त्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी सुजाता शेळके यांच्या डोक्यातील केस ओढून त्यांच्यावर चाकूने वार केले व कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी गायकवाड यास पकडले. त्यामुळे त्याला पळून जाता आले नाही.

गुन्ह्यची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी सुजाता शेळके यांनी फिर्याद नोंदविली आहे. आरोपी कैदी गायकवाड याच्याविरुद्ध कारागृह नियमावलीचा भंग केला, तुरुंग कायदा तसेच सरकारी कामात हस्तक्षेप, खुनाचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ आदी कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वाघ हे अधिक तपास करीत आहेत.