शहरातील ३४ धार्मिक स्थळे हटविण्यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग हे महापालिका आयुक्तांना मदत करीत असल्याने त्यांच्यावर आगपाखड करताना खासदार चंद्रकांत खैरे यांचा पारा भलताच चढला. या अनुषंगाने आयोजित बठकीत पोलीस आयुक्तांनी जास्त शहाणपणा करु नये, असे वक्तव्य त्यांनी केले.
मोदी सरकारचा शपथविधी होऊन दुसराच दिवस आहे, हे विशेष. ‘हरामखोर, अक्कल नाही’ असा शब्दप्रयोग खैरे यांनी बैठकीत भूमिका मांडताना केला.
दरम्यान, धार्मिक स्थळे हटविण्याच्या वादाने आता खैरेंविरुद्ध महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे असे वळण घेतले आहे. शिवसेनेने या प्रश्नी आक्रमक भूमिका घेतल्याचे सांगत खैरे यांनी आयुक्तांविरोधात शिवराळ भाषा वापरली. तसेच पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग यांनी महापालिकेच्या अवैध कामाला सहकार्य केले तर त्यांच्यावरही कारवाई करू, असेही ते म्हणाले.
शहरातील ३४ धार्मिक स्थळे हटविण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासनाकडून कारवाईच्या हालचालींना वेग आला आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेची भूमिका ठरविण्यासाठी आयोजित बठकीत खैरे यांचा पारा चांगलाच चढला. अधिकाऱ्यांच्या विरोधात गृहमंत्री आर. आर पाटील व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी खैरे यांच्या भूमिकेचे पूर्ण समर्थन केले नाही.
शहरातील ३४ धार्मिक स्थळे काढण्यापूर्वी महापालिका आयुक्त कांबळे यांना न्यायालयाच्या अवमाननेची एवढी काळजी आहे तर त्यांनी समांतर जलवाहिनीच्या प्रकरणात का विलंब सहन केला, असा सवाल करीत आयुक्त कांबळे शहरातील वातावरणात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आराखडा तयार करीत असल्याचा आरोप खैरे यांनी केला. धार्मिक स्थळ पाडण्याची प्रक्रियाच अवैध असल्याचे सांगत खैरे म्हणाले की, अवैध कामात पोलीस आयुक्त मदत करणार असतील तर त्यांना जास्त शहाणपणा करू नका म्हणावे. तसेच आता सत्ता आमच्याकडे आहे. थेट केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना सांगून कारवाई करू,अशी धमकीही दिली.
आता सत्ता आमची आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सांगून कारवाई करू.