चांदा ते बांदा योजनेतून शेतकऱ्यांना कृषी साहित्य देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी खात्याने  शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे योजना बंद झाल्यानंतर परत करण्यास चालढकल केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून ६ हजार २५० रुपये घेतले ते परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आहेत.करोनाच्या आर्थिक संकटात उपासमारीची वेळ आलेली असताना कृषी खात्याने पैसे परत करण्यास दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषी मंत्री दादा भुसे,पालकमंत्री,खासदार,आमदार यांनी याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांचे पैसे त्वरित परत करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सप्टेंबर २०१९ महिन्यात सिंधुदुर्ग कृषी खात्याने चांदा ते बांदा योजनतेतून एक भन्नाट योजना शेतकऱ्यांच्या माथी मारली. शेतकऱ्यांकडून कोणतीही मागणी नसताना एक कोळपणे,बॅटरी स्प्रे,आणि १५ किलो झिंक सल्फेट पावडर ५०० रुपये किंमतीत देण्याची योजना आखली . या सर्व वस्तूंची किंमत ५०० रुपये आहे असे सांगितले गेले.परंतु प्रथम ६ हजार ७०० रुपये भरा . नंतर ५०० वजा करून ३१ मार्च २०२० पूर्वी उरलेले ६ हजार २०० रुपये  खात्यात  जमा करू असे आश्वासन कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना दिले.

शेती करण्यासाठी या वस्तू उपयोगी पडतील या हेतूने कृषी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवत आपल्या गाठीशी जे काय पैसे होते, काहींनी उसनवारी घेत  तालुका कृषी कार्यालयात जाऊन ६ हजार ७०० रुपये भरले.सोबत आधार कार्ड व बँकेच्या पास बुकची प्रत घेतली गेली.परंतु सहा —सात महिने झाले तरी कृषी खात्याने ६ हजार २०० रुपये परत करण्यास टाळाटाळ करीत आहे.

आमच्याकडे निधी नाही असे सांगत कृषी अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत.सिंधुदुर्ग कृषी खात्त्याने दिलेला शब्द न पाळल्याने आपली फसवणूक झाली की काय ? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.या योजनेत भाग घेतलेले वैभवाडीतील १८० तर देवगड तालुक्यातील २५० शेतकरी असून जिल्ह्यातील एकूण एक हजार शेतकरी आहेत.

आम्हाला मिळालेल्या वस्तू ह्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.वस्तूंची किंमत ५०० रुपये होती मग आमच्याकडून जादा ६ हजार २०० रुपये परत देण्याच्या बोलीवर का घेतले ? आणि ते आजवर का परत केले नाहीत  ? असा सवाल होत आहे.

शेतकऱ्यांना देण्यात येणारे कृषी साहित्य शेतकऱ्यांच्या मर्जीने घ्यावे असे शासनाचे निर्देश असताना बॅटरी स्प्रे आणि कोळपणे,आणि झिंक पावडर शेतकऱ्यमंच्या माथी का मारली गेली ? कृषी खात्याने हा खटाटोप कोणासाठी केला ? असा सवाल होत आहे .याची रीतसर चौकशी होऊन संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांमध्ये होत आहे.मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी याची चौकशी करून शेतकऱ्यांना त्यांचे त्वरित पैसे परत करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० करोनामुक्त

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी करोना बाधित ४० रुग्ण करोना मुक्त झाले तर आणखी ३४ रुग्णांचे तपासणी अहवाल बाधीत आले आहेत.

जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत एकूण ४ हजार ६९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी  आणखी ३४ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.