जुळी भावंड ही दिसायला एकसारखी असतात हे एक कमालीचं वैशिष्ट आहे. मात्र, अशा भावंडांनी केलेल्या सारख्याच कामगिरी देखील कमालच म्हणाव्या लागतील. असचं एक उदाहरण पालघर जिल्ह्यात समोर आलं आहे. येथील दोन जुळ्या बहिणींनी शालान्त परीक्षेत चक्क जुळे गुण म्हणजेच एकसारखेच गुण मिळवले आहेत. या बहिणींच्या या कमालीच्या कामगिरीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

पालघर तालुक्यातील चहाडे येथील श्रीराम शिक्षम संस्थेत शिक्षण घेत असलेल्या वसरे भोईर पाडा येथे राहणाऱ्या निकिता आणि अंकिता चिंतामण डगला या दोन जुळ्या बहिणींना शालान्त परीक्षेत अर्थात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत समान गुण मिळाले आहेत. दोघींनाही अनुक्रमे ४२५ व ४२३ गुण प्राप्त झाले होते. मात्र, ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ या निकषांमध्ये दोघींना ५०० पैकी ३६४ गुण म्हणजे (७२.८० टक्के) असे समान गुण मिळाले आहेत.

सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील या बहिणी एकत्र अभ्यास करीत असत. या पूर्वीच्या परीक्षेत दोघींपैकी कोणा एकीला कमी गुण मिळाले की त्यानां वाईट वाटत असे. मात्र, यंदा त्यांना एकसारखेच टक्के मिळाल्याने दोघीपण सध्या खूप खुश आहेत. बारावीपर्यंत सफाळे येथे शिक्षण घेऊन नंतर नर्सिंगचा अभ्यासक्रम शिकण्याचा त्यांचा मनोदय आहे. जुळ्या बहिणींना सामान गुण मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांना देखील आनंद झाला आहे.